अर्धा हिंदुस्थान बंद; अनेक राज्यांकडून उपाययोजना; दुसरा बळी दिल्लीत; रुग्ण 81

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-keral

कोरोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या देशात 81 वर गेली असून देशातील दुसऱ्या बळीची नोंद दिल्लीत झाली. प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकसह अनेक राज्यांनी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. चित्रपटगृहे, नाटय़गृहे, मॉल्स, सार्वजनिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम बंद केले आहेत. जवळपास अर्धा हिंदुस्थान बंद झाल्यासारखी स्थिती आहे.

देशात शुक्रवारपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 81 झाली आहे. कर्नाटकात वृद्धाचा तर दिल्लीत महिलेचा मृत्यू झाला आहे. 81 मधील 17 जण विदेशी नागरिक आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

11 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले आढळले असून देशभरात 4200 जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

बिहारमध्ये शाळा, कॉलेज, पार्क, मॉल बंद केले आहेत. उत्तर प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड येथील शाळा, कॉलेज, विद्यापीठे बंद ठेवली आहेत.

आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडण्याचे आदेश दिले आहेत. आयआयटी कानपूरमध्ये वर्ग बंद केले आहेत.
महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, दिल्ली, केरळ, ओडिशा येथे शाळा, मॉल्स, चित्रपटगृहे, नाटय़गृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. दिल्लीत जेएनयूच्या परीक्षा पुढे ढकलल्या असून विद्यापीठ बंद ठेवले आहे.

हिंदुस्थान-बांगलादेश बससेवा बंद

  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंदुस्थानने शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून जगभरातील सर्व देशांना व्हिसा देणे बंद केले. 15 एप्रिलपर्यंत जगाला नो एण्ट्री केले आहे. आता देशाच्या सीमाही सील केल्या आहेत. 15 एप्रिलपर्यंत हिंदुस्थान-बांगलादेश दरम्यानची बससेवा बंद केली आहे.
  • देशाच्या सीमेवर 37 चेकपोस्ट आहेत. यातील 19 बंद केले आहेत. अटारी, वाघा बॉर्डरवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.

एव्हरेस्ट मोहिमेवर बंदी

‘कोरोना’चा फटका जगभरातील पर्यटनाला बसला. त्यातच आता जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट मोहीम बंद करण्यात आली आहे. चीनपाठोपाठ नेपाळनेही गिर्यारोहण परवानगी देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

  • कोरोना व्हायरसची तब्बल 125 देशांमध्ये लागण झाली आहे. आतापर्यंत 4600 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 24 तासांत 149 जणांचा मृत्यू झाला. इराणमध्ये मृतांची संख्या 354 झाली आहे. अमेरिकेत 41 जणांचा बळी गेला आहे.