हिंदुस्थानचे छोटे शेरच ‘क्रिकेटचे सिकंदर’; अंडर-19 विश्वचषक पाच वेळा जिंकून घडवला इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यश धूलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने वेस्ट इंडीजमधील अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तुफानी कामगिरी करीत पाचव्यांदा युवा विश्वविजेतेपद पटकावण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला. मध्यमगती गोलंदाज राज बावा (31 धावांत 5 विकेट) आणि रवीकुमार (34 धावांत 4 विकेट) यांच्या तुफानापुढे इंग्लंडचा डाव 44.5 षटकांत 189 धावांतच गडगडला. त्यानंतर उपकर्णधार शेख रशीद (50), निशांत सिंधू (50) आणि राज बावा (35) यांच्या झुंझार खेळीच्या बळावर टीम इंडियाने 47.4 षटकांत 6 विकेट गमावून 195 धावा नोंदवत विजेते पदाच्या चषकावर पुन्हा हिंदुस्थानचे नाव कोरले.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला. हिंदुस्थानच्या रवीकुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱयासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूने 95 धावांची झुंज दिली. तर बावाने 5 बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावला. प्रत्युत्तरात  हिंदुस्थानने  आपले सहा फलंदाज गमावले. पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर युवा टीम इंडियाने विजय मिळवला. यश धूलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

विश्वविजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 40 लाख

हिंदुस्थानने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवत पाचव्यांदा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप पटकावला. स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या हिंदुस्थानच्या छोटय़ा शेरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेक जण ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदुस्थानी संघ आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱया सदस्यांचे अभिनंदन करत आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी हिंदुस्थानच्या या विश्वविजेत्या खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे. वर्ल्ड कप विजेत्या प्रत्येक खेळाडूला 40 लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 25 लाखांचे बक्षीस जय शाह यांनी जाहीर केले आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केल्याचे शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड ः 44.5 षटकांत सर्व बाद 189 (जेम्स रियू 95, जेम्स सेल्स 34; रवीकुमार 34 धावांत 4 विकेट, राज बावा 31 धावांत 5 विकेट) पराभूत वि. हिंदुस्थान ः 47.4 षटकांत 6 बाद 195 (शेख रशीद 50, निशांत सिंधू 50, राज बावा 35; जोशुआ बॉयडेन 24 धावांत 2 विकेट)