
यजमान ऑस्ट्रलियन संघाने टीम इंडियाला तिसरी कसोटी क्रिकेट लढत जिंकण्यासाठी 407 धावांचे डोंगराएवढे आव्हान दिले आहे. आज चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने दुसऱया डावात 2 बाद 98 अशी मजल मारत 44 वर्षांनी पुन्हा एका नेत्रदीपक ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या हिंदुस्थानच्या आशा जिवंत केल्या आहेत. यष्टिरक्षक रिषभ पंत आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजाची दुखापत यामुळे हिंदुस्थानला केवळ आठ फलंदाजांना घेऊन ही लढत जिंकावी अथवा ड्रॉ राखून वाचवावी लागणार आहे.
दुसऱया कसोटीत चिवट फलंदाजी करणारा कर्णधार अजिंक्य रहाणेने पुन्हा उद्या ‘अजिंक्य’ खेळी केल्यास हिंदुस्थानी विजयाचा शंखध्वनी पुन्हा सिडनीच्या मैदानात वाजू शकतो, पण आता आव्हान खडतर आहे. कारण कांगारूंच्या वेगवान गोलंदाजांचा तोफखाना तुफानी वेगाने धडाडत असून लायनसारख्या फिरकी गोलंदाजालाही सिडनीची खेळपट्टी साथ देऊ लागली आहे, पण रहाणे-पुजारा जोडीने संयमाने आणि चिकाटीने फलंदाजी केल्यास टीम इंडियाला 90 षटकांत विजयासाठीच्या 309 धावा करणे शक्य आहे. याआधी हिंदुस्थानी संघाने 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करून सामना जिंकला आहे. तीच कामगिरी हा संघ पुन्हा करणार का? याकडे अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. सिडनीत आज यजमान ऑस्ट्रेलियन संघाने आपला दुसरा डाव 6 बाद 312 धावांवर घोषित केला आणि हिंदुस्थानला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले आहे.



























































