
ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 च्या अहवालामध्ये भुकेची समस्या प्रामुख्याने असणाऱ्या देशांमध्ये 125 देशाच्या यादीत हिंदुस्थानची 111 व्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हिंदुस्थानाची सातत्याने घसरण होत आहे. 2022मध्ये हिंदुस्थान 107, तर 2021मध्ये 101 व्या स्थानावर होता. मात्र यावर्षी भुकेचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात हिंदुस्थानचा क्रमांक आणखी खाली घसरला आहे. विशेष म्हणजे भूक आणि उपासमारीच्या बाबतीत हिंदुस्थान नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षाही मागच्या रांगेत जाऊन बसला आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. जगभरातील 125 देशांच्या यादीत हिंदुस्थानचा 111 व्या स्थानावर आहे. या यादीत पाकिस्तान 102, बांगलादेश 81, नेपाळ 69 आणि श्रीलंका 60व्या स्थानावर आहे. 2014 च्या क्रमवारीत हिंदुस्थान 55 व्या स्थानावर होता. मात्र मोदी सरकार आल्यापासून ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये हिंदुस्थानची तब्बल 56 स्थानांनी घसरण झाली आहे.
काय आहे अहवाल
- हिंदुस्थानातील 18.7 टक्के मुले कृश आहेत.
- हिंदुस्थानातील कुपोषित मुलांचे प्रमाण 16.6 टक्के .
- पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण 3.1 टक्के आहे.
- हिंदुस्थानातील 15 ते 24 वर्षे वयोगटातील 58.1 टक्के महिला पांडुरोगाचा सामना करत आहेत.
- ग्लोबर हंगर इंडेक्समध्ये हिंदुस्थानचा स्कोअर 28.7 (गंभीर) आहे.
अहवाल चुकीचा
दरम्यान, केंद्र सरकारने ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सने हिंदुस्थानची सद्यस्थिती दर्शवली नाही. देशाची प्रतिमा मलिल करण्याचा हा प्रयत्न आहे, असे महिला आणि बालविकास मंत्रालयाने म्हटले. अहवालातील चारपैकी तीन निर्देशांक मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहेत, ते संपूर्ण लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा निर्देशंक ओपिनिय पोलवर आधारित आहे, असे केंद्राने म्हटले.






























































