विराट पेटलाय, पुन्हा ठोकले खणखणीत शतक 110 चेंडू 166 धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या हिंदुस्थान आणि श्रीलंकेतील वनडे मालिकेतील आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटने आग ओकली. ‘रन मशीन’ अशी ओळख असलेल्या विराटने तुफान फटकेबाजी करत वनडेतील 46वे शतक झळकावले. 110 चेंडूंत 13 चौकार आणि 8 खणखणीत षटकार ठोकत विराटने 166 धावांची नाबाद खेळी केली. विराटसोबतच सलामीवीर शुभमन गिल यानेही शतक झळकावत 116 धावांची खेळी केली. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने 390 धावांचा डोंगर उभारला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या श्रीलंकेचा संघ 73 धावांत गारद झाला. हा सामना 317 धावांनी जिंकत हिंदुस्थानने लंकेला व्हाईट वॉश दिला असून वनडेतील हिंदुस्थानचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके ठोकण्याचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम आज विराटने मोडला. सचिनच्या नावावर हिंदुस्थानात 20 शतके आहेत तर कोहलीने 21 शतके झळकावून नवा विक्रम केला. तसेच या सामन्यात त्याने महेला जयवर्धनेचाही विक्रम मोडला आहे. कोहली जगातील पाच सर्वात यशस्वी फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.