हिंदुस्थानी बॉक्सिंग संघातील आठ सदस्यांना कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुर्कस्तान दौऱयावर गेलेल्या हिंदुस्थानच्या बॉक्सिंग पथकातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन खेळाडूंचाही समावेश आहे. संघातील जे सदस्य निगेटिव्ह आहेत ते मायदेशी परतले असून कोरोना झालेल्यांना इस्तंबूलमध्येच क्वारंटाइन करण्यात आले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता गौरव सोलंकी (57 किलो), प्रयाग चौहान (71 किलो) व ब्रिजेश यादव (81 किलो) हे तीन बॉक्सिंगपटू मागील आठवडय़ात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळेच 19 मार्चला स्पर्धा संपल्यानंतरही त्यांना इस्तंबूलमध्येच क्वारंटाइन राहावे लागले. याशिवाय संघाचे प्रशिक्षक धर्मेंद्र यादव व संतोष बिरमोल, फिजिओ शिखा केडिया व डॉ. उमेश, व्हिडीओ विश्लेषक आणि फिजिओथेरापिस्ट नितीन कुमार यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

हिंदुस्थानचा 13 सदस्यीय बॉक्सिंग संघ बोसफोरस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इस्तंबूलमध्ये गेला होता. 15 मार्चपासून सुरू झालेल्या स्पर्धेत निखत झरीन (51 किलो) आणि गौरव सोलंकी (57 किलो) यांनी हिंदुस्थानला कास्यपदक जिंकून दिले.