ब्रेकिंग : पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा घुसखोरीचा प्रयत्न वायुसेनेने उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाचे आहेत. अशात पाकिस्तानच्या हवाई दलाच्या एका कृतीमुळे तणावामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. सोमवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा हिंदुस्थानच्या हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न वायुसेनेने उधळून लावला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 वाजता पंजाबच्या खेमकरण सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ पाकिस्तानचे ड्रोन आणि चार मोठ्या आकाराचे अमेरिकन बनावटीचे ‘एफ-16’ ही लढाऊ विमानं घिरट्या घालत असल्याचे रडारमध्ये दिसून आले. पाकिस्तानच्या मनातील काळंबेरं ओळखून हिंदुस्थानच्या वायुसेनेने तात्काळ ‘सुखोई-30 एमकेआय’ आणि ‘मिराज’ हे लढाऊ विमान प्रत्युत्तरादाखल उतरवले. सुखोई आणि मिराज या अत्याधुनिक विमानांनी आकाशामध्ये झेप घेतल्याचे पाहाताच पाकिस्तानच्या विमानांनी काढता पाय घेतला.

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या मिराज विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला होता. यानंतर पाकिस्ताने देखील तसाच प्रयत्न केला होता. परंतु हिंदुस्थानच्या वायुसेनेने प्रयत्नांची पराकाष्ठा करत पाकिस्तानच्या विमानांना हुसकावून लावले होते. वायुसेनेने केलेल्या कारवाईदरम्यान पाकिस्तानचे अमेरिकन बनावटीचे ‘एफ-16’ विमान पाडण्यात हिंदुस्थानला यश आले होते. तेव्हापासून पाकिस्तान हिंदुस्थानवर डुख धरून आहे. सोमवारी मध्यरात्री पाकिस्तानने केलेला घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत हिंदुस्थानच्या वायुसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.