रेल्वे 5600 आयसोलेशन कोच तयार करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे ‘कोविड-19’ चा मुकाबला करण्यासाठी एकूण 5600 आयसोलेशन कोचेस तयार करणार आहे. या आयसोलेशन कोचेसचा कोविड रूग्णांना क्वारंटाईन तसेच उपचार करण्यासाठी होत आहे. दिल्ली तसेच महाराष्ट्रातील नंदूरबार जिह्यात या कोविड कोचेसना संबंधित राज्य सरकारच्या मागणीहून उपलब्ध करण्यात आले आहे.

रेल्वेने गेल्यावर्षी कोविडचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वेच्या जुन्या कोचेसचे रूपांतर रूग्णांच्या उपचारासाठी छोटेखानी आरोग्य केंद्राच्या रूपात करण्यास सुरूवात केली होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सुमारे हजार असे कोविड आयसोलेशन कोचेस तयार करून सुसज्ज ठेवले होते. गेल्यावर्षी या कोचेसना मागणी नव्हती. परंतू यंदा कोरोनाची लाट ग्रामीण भागातही मोठी असल्याने हे कोचेस नंदुरबार जिह्यात वापरण्यात आले आहेत.

दिल्लीतील शकुरबस्तीत 50 कोचेस (800 बेड्स)तर आनंदविहार येथे 25 कोचेस (400बेड्स) सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात नंदूरबार रेल्वे स्थानकात 21 कोचेस (378बेड्स)वर 32 पेशंटवर उपचार सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात जशी राज्य सरकारकडून मागणी होईल तसे कोविड कोच उपलब्ध केले जातील अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.