इलाजानंतरही खाज थांबली नाही, रुग्णाने केली डॉक्टरच्या बायकोची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन, इंदूर

त्वचेला सतत खाज येत असल्याने डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या रुग्णाने डॉक्टरच्या बायकोचा खून केला आहे. रफीक रशीद (वय-45 वर्ष) असं आरोपीचं नाव असून त्याने केलेल्या हल्ल्यात डॉ.रामकृष्ण वर्मा यांची पत्नी लता यांचा मृत्यू झाला आहे.इंदूरच्या माळवा मिल परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

रफीकच्या अंगाला सतत खाज येत होती, ज्यावर डॉक्टर रामकृष्ण उपचार करत होते. सहा महिने उपचार घेतल्यानंतरही रफीकची खाज काही कमी होत नव्हती. गुरुवारी रफीक वर्मा यांच्या क्लिनिकमध्ये गेला होता. वर्मा यांची बायको लता हिने डॉक्टर घरी नाहीयेत त्यांना यायला उशीर होईल असं रफीकला सांगितलं. यामुळे संतापलेल्या रफीकने डॉक्टर नसतील तर तू उपचार कर असं म्हणत लता यांना त्रास द्यायला सुरुवात केली. यातून रफीक आणि लता यांचं भांडण झालं आणि रफीकने लता यांच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली. लता यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा मुलगा अभिषेकने लता यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. रफकने केलेल्या हल्ल्यात लता यांचा मात्र मृत्यू झाला आहे.

रफीक हा क्लिनिकमध्ये चाकू घेूनच गेला होता, यावरून पोलिसांना संशय आहे की तो डॉक्टर वर्मा यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असावा. डॉक्टर नसल्याने त्याने त्यांच्या बायकोवर हल्ला केला. रफीक हा खुनाच्या प्रकरणातील आरोपी असून 2005 साली त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला होता.