‘उद्योग मॅप’ तयार करा! स्थानिकांना रोजगार द्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्योग विभागाला सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील प्रादेशिक वैशिष्टय़े, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरू करता येतील, हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करण्यात यावा. कोरोनाच्या संकटात राहत असलेल्याच ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. यासाठी येणाऱया उद्योगांनुसार स्थानिकांना प्रशिक्षण द्या. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटेल, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग विभागाला देतानाच ‘उद्योग मॅप’नुसार आवश्यक त्या सोयीसुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा, त्या प्रगतीस पूरक ठरणाऱया पायाभूत सुविधांमध्ये होणाऱया सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी दै. ‘लोकसत्ता’ने ‘इंडस्ट्रियल काॅन्क्लेव्ह 2021चे आयोजन केले होते, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, सीआयआयचे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते.

मराठी उद्योजकांनी जगात ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ म्हणून काम करावे

महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी ‘आपलेपणा’ची भावना घेऊन पुढे आला आहे. हे राज्य आपल्यापैकी काही जणांची जन्मभूमी आहे पण अनेकांची कर्मभूमीही आहे. या कर्मभूमीची सुबत्ता वाढवण्याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्राला ‘आपलं’ समजून या राज्यात गुंतवणूक करणाऱया प्रत्येक उद्योजकाने देश आणि जगाच्या पातळीवर या राज्याचा ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ म्हणून काम करावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

समतोल साधूनच उद्योगांसाठी सुविधा

उद्योगांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, विजेचे दर कमी करणे यांसारख्या विषयांवरही शासन काम करत आहे, परंतु असे निर्णय घेताना राज्याचा समतोल विकास होईल याकडेही लक्ष द्यावे लागते, सर्वसामान्य नागरिकांसह अनेक क्षेत्रांकडेही लक्ष देणे गरजेचे असते याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.