यूजर्सवरील दडपण कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने ‘लाइक’चा पर्याय हटवला

85

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यूजर्सवरील दडपण कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामवरील ‘लाइक’चा पर्याय हटवण्यात येणार आहे. आपल्या आणि इतरांच्या पोस्टला किती लाइक मिळाले आहे, याची चढाओढ नेहमी यूजर्समध्ये असते. मात्र, आपल्या पोस्टला कमी लाइक मिळाल्याचे दडपण काही यूजर्सवर येते. त्यामुळे अनेकजण मानसिक दडपणाखाली जातात. यूजर्सवरील हे दडपण कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने लाइकचा पर्याय हटवण्याचा निर्णय घेतला आहे. काही देशांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सध्या हा पर्याय हटवण्यात आला असून कधीपर्यंत हा पर्याय बंद असेल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

इन्स्टाग्रॅमने प्रायोगिक तत्त्वावर ऑस्ट्रेलिया, ब्राझीलसह इतर काही देशात हा पर्याय गुरुवारपासून हटवला आहे. सोशल मिडीयामुळे अनेकजण मानसिक दडपणाखाली येत असल्याची टीका होत असल्याने इन्स्टाग्रामने हा निर्णय घेतला आहे. सहा देशांमध्ये इन्स्टाग्रामने प्रायोगिक तत्त्वावर काही बदल केले आहेत. त्यामुळे इतरांच्या पोस्टला किती लाइक मिळाले हे आता दिसणार नाही. यूजर्सला मुक्तपणे स्वतःला व्यक्त करता यावे, यासाठी हे व्यासपीठ आहे. हा पर्याय हटवल्यामुळे यूजर्स आता तणावमुक्त राहून स्वतःला व्यक्त करू शकतील, असे ऑस्टेलिया आणि न्यूझीलंडमधील फेसबुकचे धोरण ठरवणाऱ्या संचालक मिआ गार्लिक यांनी सांगितले.

हा पर्याय हटवल्यामुळे आपल्या पोस्टला किती लाइक मिळतील, इतरांच्या पोस्टला किती लाइक मिळाले आहे, ही स्पर्धा संपेल आणि मुक्तपणे यूजर्सला व्यक्त होता येईल, असे सांगण्यात आले. ऑस्ट्रेलिया, इटली, आर्यलंड, जपान, ब्राझील आणि न्यूझीलंड या देशांमध्ये प्रायोगित तत्त्वावर हा पर्याय हटवण्यात आला आहे. कॅनडामध्ये मे महिन्यापासून याची सुरुवात करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामचे जगभरात एक अब्जापेक्षा जास्त यूजर्स आहेत. या अॅपद्वारे फोटो, व्हिडिओ पोस्ट करता येतात. त्यावर अनेकजण लाइक अनलाइक करण्यासह प्रतिक्रिया देतात. मात्र, सध्या पोस्टला किती लाइक मिळाले, याकडे अनेकांचे लक्ष असते. त्यातून चढाओढ आणि मानसिक दडपण वाढते. त्यामुळे यूजर्सवरील दडपण कमी करण्यााठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्वतःच्या पोस्टला आलेले लाइक बघण्याचा पर्याय यूजर्सला असेल. नुकत्याच झालेल्या काही संशोधनानुसार सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे यूजर्सवर मानसिक दडपण येत असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हा पर्याय हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम हा सोशल मिडीयावरील अंत्यत धोकादायक अॅप असून त्यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे यूकेमधील एका संशोधनात नमूद करण्यात आले आहे. लाइक आणि प्रतिक्रियांमुळे सुमारे 40 टक्के यूजर्सला मानसिक दडपण येत असल्याचे अमेरिकेतील एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे. आपल्या पोस्टला किती लाइक किंवा प्रतिक्रिया आल्या हे बघण्यापेक्षा यूजर्सने मनसोक्तपणे व्यक्त व्हावे, असे इन्स्टाग्रामकडून सांगण्यात आले आहे. तसेच इन्स्टाग्राम हे स्पर्धा वाढवण्यासाठी नसून व्यक्त होण्यासाठी चांगले माध्यम आहे, असे इन्स्टाग्रामकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या