
संस्थेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या आपल्याच कर्मचाऱ्याकडून 34 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना जालन्यातील एका संस्थेच्या अध्यक्षांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. श्रीराम राठोड असे लाचखोर संस्था अध्यक्षाचे नाव आहे.
जालना शहरापासून जवळच सहाय्यक परिवहन कार्यालयाच्या रस्त्यावर तुळजा देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अपंग निवासी विद्यालय आहे. या विद्यालयाचा शिपाई कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे गैरहजर होता. दोन महिन्यांनी शाळेत हजर झाल्यावर संस्थाचालक श्रीराम सवाई राठोड ( वय 59, रा. इन्कम टॅक्स कॉलनी) यांनी त्याला आणखी दोन महिने घरी थांबण्यास सांगितले. त्यामुळे शिपाई शाळेत आला नाही. त्यानंतर शाळेत हजर होण्यासाठी शिपाई आला असता संस्थाचालकांनी चार महिन्याचा पगार काढण्यासाठी 72 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
शिपायाला हजर करून घेतल्यानंतर त्याने मे व जून महिन्याच्या पगारापोटी 26 हजार 500 रुपये दिले. त्यानंतर पुढील 3 महिन्याचे दरमहा 11 हजार 500 रुपये याप्रमाणे 34 हजार 500 रुपयांची मागणी करण्यात आली. ते पैसे दिल्याशिवाय हजर करून घेणार नाही अशी धमकी राठोड यांनी शिपायाला दिली. शिपायाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार संस्थेचे अध्यक्ष श्रीराम सवाई राठोड यांना शिपायाकडून 34 हजार 500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.
आपल्या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर संस्थेच्या अध्यक्षांचा डोळा होता. पगार झाल्यानंतर ठरलेली रक्कम लगेच संस्थेच्या अध्यक्षाला द्यावी लागत असे. ते पैसे दिले नाही तर मुख्याध्यापकांना सांगून संस्थेचा अध्यक्ष रुजू करून घेत नसे. त्यामुळे, शिपायाने 26 हजार 500 रुपये लॉकडाऊनच्या काळात दिले होते. त्यानंतर पुन्हा 34 हजार 500 रुपयांची मागणी होत असल्याने शिपाई वैतागला होता. त्यामुळे, त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीराम राठोड यांना लाच स्वीकारताना रंगहात पकडण्यात आले. त्यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.






























































