पाकिस्तानातील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानातील दहशतवाद्यांना आता अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. हिंदुस्थानच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दहशतवाद्यांनी पाकव्याप्त कश्मीरमधून त्यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे अफगाणिस्तानात हलवल्याची माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर परदेशातील हिंदुस्थानी दूतावास असल्याने त्या कार्यालयांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांनी पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेजवळ हलवली आहेत. या सीमाभागात त्यांचा कारवाया वाढल्याने अफगाणिस्तानातील दूतावासाला हाय अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या सुरक्षेसाठी आणि हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने ही शिबिरे हलवली आहेत. अफगाणिस्तानातील कुनार, ननगरहार, नूरिस्तान, कंधार प्रांतात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसारख्या दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटनांशी हातमिळवणी केल्याची माहिती मिळाली आहे. या संघटनांकेडून दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातच घातपाती कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे सुरू असल्याने पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर फक्त दिखाव्यासाठी कारवाई केल्याचे मत हिंदुस्थानने व्यक्त केले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात फक्त दिखाव्यासाठी कारवाई करू नये, पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करण्याची गरजही हिंदुस्थानने व्यक्त केली आहे. यावर्षी पॅरिसमध्ये वित्तीय कारवाई कार्य बल म्हणजेच एफएटीएफचे संमेलन होणार आहे. या संमेलनात पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येऊ नये, यासाठी पाकिस्तानने दिखावा करत कारवाई केली आहे. पाकिस्तान कारवाईचा देखावा करून धूळफेक करत आहे. या संघटनेने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. दहशतवादी शिबिरे अजूनही सुरू असल्याने हिंदुस्थानी दूतावासांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.