वर्ल्ड कप राऊंडअप – विराटच्या पुढे रोहित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड कपच्या दोन सामन्यात धुवांधार फलंदाजी करणाऱया विराट कोहलीने आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तो प्रथमच विराट कोहलीच्या पुढे पोहोचला असून विराट नवव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम (836 गुण) अव्वल स्थानी असून हिंदुस्थानच्या शुबमन गिलला एक मोठी खेळी नंबर वन बनवू शकतो. तो 818 गुणांसह दुसऱया क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत हिंदुस्थानचे तीन खेळाडू टॉप टेनमध्ये आहेत. गोलंदाजीत जोश हेझलवूड 660 गुणांसह अव्वल तर ट्रेंट बोल्ट 659 आणि मोहम्मद सिराज 654 गुणांसह दुसऱया-तिसऱया क्रमांकावर आहेत.

शाकिब सर्वात घातक

विराट कोहलीने बांगलादेशच्या शाकिब अल हसनकडून हिंदुस्थानी फलंदाजांना खूप धोका असल्याचे खुद्द विराट कोहलीनेच मान्य केले आहे. तोच या सामन्यातील सर्वात घातक गोलंदाज आहे. त्याच्यापासून सर्वांनाच सावध राहावे लागेल. त्याच्याकडे अद्भुत नियंत्रण आहे. तो नव्या चेंडूनेही भन्नाट गोलंदाजी करतो. तो नेहमीच फलंदाजांना फसवण्यात माहीर आहे आणि तो कमी धावा देणारा गोलंदाज असल्याचे विराट कोहली म्हणाला.

पाकिस्तानच्या सरावात नऊ खेळाडू

तापाने फणफणलेल्या पाकिस्तानी संघातील केवळ नऊ खेळाडूच सरावासाठी मैदानात उतरल्यामुळे संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांचे सहा खेळाडू आज सरावाला न उतरल्यामुळे जो तो त्यांच्याबद्दलच चौकशी करत होता. परंतु संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे सर्व खेळाडू आता ठीक आहेत. पण मोहम्मद रिझवान, शाहिन आफ्रिदी, अब्दुल्ला शफीक, सलमान अली, मोहम्मद हारिस आणि जमान खान हे सहा खेळाडू सरावाला अनुपस्थित होते. शुक्रवारी पाकिस्तानची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

कारवाईची शक्यता कमीच

हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवान बाद होताच प्रेक्षकांनी धार्मिक घोषणा केल्याप्रकरणी पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली आहे. मात्र त्यांच्या या तक्रारीबाबत प्रेक्षकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या खेळाडूवर वर्णद्वेषी किंवा जातिवाचक घोषणाबाजी झाली असेल तर कारवाईची तरतूद आहे.