राजन साळवींच्या कुटुंबीयांना अंतरिम अटकपूर्व जामीन; हायकोर्टाकडून मोठा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना गुरुवारी उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. राजन साळवींच्या पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांना न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) सूडबुद्धीने सुरु केलेल्या कारवाईला या निर्णयाने मोठा झटका बसला आहे.

आमदार राजन साळवी यांना मिंधे गटात प्रवेश करण्यास भाग पाडण्यासाठी राजकीय षड्यंत्र रचले गेले. त्याच कारस्थानातून एसीबीने साळवींच्या घरी छापेमारी केली. या कारवाईवर आक्षेप घेत अनुजा साळवी व त्यांचे पुत्र शुभम साळवी यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी साळवी कुटुंबीयांतर्फे ऍड. सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला आणि एसीबीच्या एफआयआरमधील बेहिशेबी संपत्तीचे आरोप चुकीचे असल्याचा दावा केला. आपण काहीही गैर केलेले नाही. उत्पन्न स्रोतासंबंधी सर्व वैध कागदपत्रे आपल्याकडे असून ती तपास यंत्रणेपुढे सादर करण्यास तयार आहे, असे म्हणणे ऍड. पासबोला यांनी मांडले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करीत मोठा दिलासा दिला.

कथित बेहिशेबी संपत्तीप्रकरणी रत्नागिरी एसीबीने साळवी कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 2 ते 8 मार्चदरम्यान एसीबीपुढे चौकशीसाठी हजर रहा आणि तपासात सहकार्य करा, अशी सूचना न्यायालयाने साळवी कुटुंबीयांना केली.