जागतिक पुस्तक दिन : बालवाचक गेले कुठे…

वाचाल तर वाचाल, असे म्हणत आपण वाचनाचे महत्त्व अधोरेखित करतो. पण हल्लीची पिढी पुस्तकांपासून दूर जात आहे. ‘लहान मुले वाचत नाहीत. मोबाईल गेममध्ये डोके खूपसून आहेत,’ अशा तक्रारी वाढल्या आहेत. सध्या मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून काही उपक्रम सुरू आहेत. मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

दादर येथील दादर सार्वजनिक वाचनालयात (दासावा) सालाबादप्रमाणे 15 एप्रिलपासून बालवाचनालय सुरू झाले. 10 जूनपर्यंत सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुले लायब्ररीत बसून आपल्याला हवे ते पुस्तक वाचू शकतात. तेही अगदी मोफत. मात्र बालवाचनालयाकडे अगदी मोजक्या मुलांची पावले वळत आहेत. जास्तीत जास्त मुलांनी बालवाचनालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दासावातर्फे करण्यात आले आहे.

वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीत अडीचशे-तीनशे बालवाचक आहेत. लवकरच नॅशनल लायब्ररीत दरवर्षीप्रमाणे मुलांसाठी मोफत बालवाचनालय सुरू होणार आहे. सुट्टीत मुलांना लायब्ररीत बसून भरपूर पुस्तके वाचायला येणार आहेत.

गोष्टीतून वाचनाची आवड

वाचनाची सवय गोष्टीतून लागते. गोष्टी ऐकण्यापासून झालेली सुरुवात गोष्टी वाचण्यापर्यंत जाते. ‘टार्ंनग पेज’ संस्था मुलांना गोष्टीरूपात पुस्तके सांगून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करते. मुलांमध्ये पुस्तकांविषयी कुतूहल निर्माण होते अन् मुले पुस्तके हाताळायला बघतात.

 वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीने ‘टार्ंनग पेज’ या संस्थेच्या सहकार्याने जोगेश्वरीच्या दोन शाळा, वांद्रे येथील बीपीईएस शाळेत असे प्रयोग केले आहेत. लवकरच हा उपक्रम व्यापक स्वरूपात जास्तीत जास्त शाळांमध्ये करण्याचा नॅशनल लायब्ररीचा मानस आहे. त्यादृष्टीने ‘टार्ंनग पेज’ संस्थेशी बोलणी सुरू असल्याचे नॅशनल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांनी सांगितले.