गुगलच्या सह-संस्थापकाचा विचित्र निर्णय, रागाच्या भरात कोट्यवधी रुपयांची देणगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगलचे सह-संस्थापक सर्गे ब्रिन यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या करविषयक वादाच्या पार्श्वभूमीवर मोठे आणि आश्चर्यकारक पाऊल उचलले आहे. ब्रिन यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये प्रस्तावित असलेल्या नवीन व्यवसाय कर कायद्याचा निषेध करण्यासाठी सुमारे 5 लाख डॉलर्स, म्हणजेच अंदाजे 4.77 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिन यांनी ओव्हरपेड सीईओ टॅक्स (Overpaid CEO Tax) नावाच्या या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एका राजकीय समितीला ही रक्कम दान केली आहे. या कर प्रस्तावावरून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे. ‘मेजर सी’ (Measure C) आणि ‘मेजर डी’ (Measure D) या दोन वेगवेगळ्या कर प्रस्तावांवर 2 जू रोजी मतदान होणार आहे.

‘मेजर सी’ला व्यापारी संघटना आणि उद्योजकांनी पाठिंबा दिला आहे. या कर प्रस्तावानुसार लहान व्यवसायांना कर सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. लहान व्यवसायांसाठी कर सवलतीची मर्यादा 50 लाख डॉलर्सवरून 75 लाख डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मोठ्या कंपन्यांवरील कराचा बोजा वाढेल.

दुसरीकडे, ‘मेजर डी’ हा कर प्रस्ताव वादात सापडला आहे. याला ‘ओव्हरपेड सीईओ टॅक्स’ म्हटले जात आहे. या प्रस्तावानुसार, कंपनीच्या सीईओ आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातील फरकावर आधारित कर आकारला जाईल. विशेष म्हणजे, यात केवळ सॅन फ्रान्सिस्कोमधीलच नव्हे, तर कंपनीच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही समावेश असेल. शहराची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी मोठ्या आणि श्रीमंत कंपन्यांनी जास्त कर भरावा, असे कामगार संघटना आणि पुरोगामी गटांचे म्हणणे आहे. मात्र व्यावसायिक गटांचा दावा आहे की या करामुळे कंपन्या सॅन फ्रान्सिस्कोतून स्थलांतर करू शकतात, ज्याचा थेट नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.

या नव्या प्रस्तावित कर प्रणालीमुळे सर्गेई ब्रिन नाराज असल्याचे म्हटले जाते. ब्रिन यांनी या प्रस्तावाला विरोध करत एका पर्यायी, व्यवसाय-अनुकूल प्रस्तावाला आर्थिक पाठिंबाही दिला आहे. ब्रिन यांची एकूण संपत्ती अंदाजे 260 अब्ज डॉलर्स आहे. ब्रिन समाजवादाच्या विरोधात असल्याचे अलिकडेच त्यांनी एका निवेदनात म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.