व्ही. शांताराम पुरस्कार : दोन पिढ्यांचा गौरव

168

>> शिबानी जोशी

नुकताच राज्य शासनाने व्ही. शांताराम पुरस्कार दोन पिढय़ांना देऊन त्यांचा गौरव केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी आणि सुपरस्टार भरत जाधव यांच्याशी गप्पा!

त्या काळच्या मराठी चित्रपटात डॅशिंग नायिका तुम्ही कशा सादर केल्यात?
सुषमा शिरोमणी – लहानपणापासून मुलांबरोबर क्रिकेट खेळणं, सूरपाटय़ा खेळणं असे रांगडे खेळ खेळत असे. चित्रपटात त्या काळात तमासगीर स्त्री, पाटलाच्या वाडय़ातील डोक्यावर पदर घेतलेली, दाराआड सतत उभी राहणारी स्त्री मला भावली नाही. म्हणून नायिका फक्त मुळूमुळू रडणारी नसते तर धाडसी, साहसी, बिनधास्त हाणामाऱया करणारी तरीही आतून स्त्री-हृदयाची कोमल असू शकते हे दाखवून दिलं. पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे असे भन्नाट रूप दाखवणारे हे चित्रपटही समाजानं स्वीकारले आणि एक नवा प्रवाह मराठी चित्रपटात 1970-80 च्या दशकात आला. खेडोपाडी यात्रा – जत्रांच्या तंबूमध्ये टुरिंग टॉकीजमध्ये माझ्या हाणामारीच्या, उडय़ांच्या दृश्यांवर टाळा-शिटय़ा मिळायच्या. त्यामुळेच सर्व चित्रपट सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली हिट ठरले.

व्ही. शांताराम यांच्या नावाने पुरस्कार मिळाला याचं अप्रुप वाटलं असेल?
भरत जाधव – राज्य शासनाचा ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार मिळाला. त्यावेळी मी भावुक झालो होतो. कारण ज्या परळ भागात माझे लहानपण गेले तिथेच अगदी सुरुवातीला व्ही. शांताराम यांच्याच चाळीत भाडेकरू म्हणून मी राहत होतो. त्यामुळे ज्यांच्या चाळीत राहत होतो त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे किती भाग्याचे लक्षण आहे हे तोच कलाकार जाणू शकतो. जे चित्रपटसृष्टीचे महर्षी मानले जातात त्यांच्याच चाळीत राहत असताना प्रथम शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये काम करू लागलो. त्यानंतर ‘ऑल द बेस्ट’मुळे नाटय़सृष्टीत स्थिरावलो. हे करत असतानाच ‘जत्रा’, ‘पछाडलेला’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘श्रीमंत दामोदरपंत’ अशा काही चित्रपटांत कामे केली. ‘हसा चकटफू’, ‘साहेब, बीवी आणि मी’, ‘आली लहर केला कहर’सारख्या मालिकाही केल्या.

आयटम साँग ही संकल्पना मराठमोळ्या ढंगात लोकप्रिय करण्याचं श्रेय तुम्हाला जातं. याविषयी सांगा?
सुषमा शिरोमणी – ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा’ यामध्ये रेखाची दिलखेचक अदा मराठीमध्ये पाहायला मिळाली. रेखाला या गाण्याविषयी विचारलं तेव्हा ती लगेच ‘हो’ म्हणाली. नथ घालायला मिळणार म्हणून रेखा आनंदित झाली होती, पण त्या दिवशी शूटिंग ठरलं होतं त्याच वेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. सगळीकडे तणावग्रस्त स्थिती होती, पण रेखा म्हणाल्या, ‘‘घाबरू नको’’ मी अगदी पहाटेच येते. म्हणजे प्रश्न येणार नाही आणि रेखा अगदी पहाटेच सेटवर आली व शूटिंगही केलं. या मोठय़ा कलाकारांची कामावरची निष्ठा खरंच मानली पाहिजे. जितेंद्र पण त्याकाळात खूप प्रसिद्ध होते. त्यांना गाण्याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी चटकन म्हटलं की, ‘‘करुंगा, पर मेरे पास सिर्फ परसो का दिन खाली है।’’ तेव्हा एका दिवसांत गाणं लिहून, रेकॉर्ड करून, सेट लावून शूटिंगही केलं आणि जितेंद्र साब मराठीत चमकले.

यशाचं श्रेय कोणाला देता?
भरत जाधव – व्ही. शांताराम, शाहीर साबळे आणि त्यांचं कुटुंब तसंच माझं कुटुंब आणि माझे मित्र यांचे मी आभार मानतो. संपूर्ण कारकीर्दीमध्ये या सर्वांचे फार मोठं सहकार्य मिळालं आणि म्हणूनच इतका मोठा पल्ला गाठू शकलो. व्ही. शांताराम यांच्या नावाच्या पुरस्कारामुळे सर्व बालपण डोळय़ांसमोर आले आणि त्यामुळे हा दिवस सतत जाणीव करून देत राहील की, सतत चांगलं काम करीत रहा. हा पुरस्कार मला सतत प्रेरणा देणारा आहे.

हिंदी, मराठी, गुजराथीतील चित्रपट प्रवास कसा झाला?
सुषमा शिरोमणी – गुजराती चित्रपटात अभिनयासोबत कथालेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका केली आहे. माझा प्रवास हिंदीतून मराठीकडे झाला, पण हिंदी सिनेसृष्टीशी संबंध असल्यामुळे ‘इम्पा’ या संघटनेमध्ये सचिव, अध्यक्ष या पदांवर 1985पासून भूमिका बजावली आहे.

जॉन बेली यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यावर कसं वाटलं?
भरत जाधव – ऑस्करपर्यंत आपण जाऊ की नाही, माहीत नाही, परंतु आज जॉन बेली यांच्या हस्ते मिळालेला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार ऑस्करपेक्षा मोठा वाटतोय.

आपली प्रतिक्रिया द्या