शेजारधर्म- छोट्या छोट्या गोष्टीतून मने जिंकली जातात! विभावरी देशपांडे

>> विभावरी देशपांडे (अभिनेत्री)

छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून मनं साधली जातात आणि जिंकलीही जातात. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे या काळात घराबाहेर पडता येत नसले तरी पैशांच्या स्वरूपात अनेकांना मी मदत केली. जेवढी मला शक्य झाली तेवढी मी वेगवेगळ्या संस्थांना मदत केली. खूप मोठी अशी नाही, पण खारीचा वाटा उचलून मदत करत होते.

पुण्यात कोथरूडला आमची गेटेड कम्युनिटी आहे. आमच्या इथे निवृत्त पोलिस कमिशनर राहतात. ते वयस्कर नवरा-बायको आहेत. त्यांची मुलं इथे नसतात. त्यामुळे ते दोघंच राहतात. त्यात लॉकडाऊनमध्ये घरकाम करणाऱया मावश्याही येत नव्हत्या. त्यामुळे आम्ही सोसायटीने त्यांची खाण्या-पिण्याची योग्य व्यवस्था केली होती. त्यांच्या पत्नीही आजारी होत्या. त्यांना या काळात बाहेरून डबा वगैरे लावणं शक्य नव्हतं. त्यामुळे आमच्या सोसायटीतल्याच लोकांनी व्हॉट्सऍपवर एक समूह तयार केला आणि वेळापत्रक केलं. त्याच्यामध्ये सकाळ-संध्याकाळ चहा, दुपारचं जेवण, रात्रीचे जेवण कोण देणार असे प्रत्येकाने आखून घेतले आणि तिन्ही महिने आम्ही त्यांना आळीपाळीने जेवण पोहोचवत होतो. नंतर आमचे वॉचमन जे होते, ते चहा प्यायला बाहेर जायचे, पण लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद असल्यामुळे त्यांना चहा वगैरे काही मिळायचे नाही. आम्ही सर्वांनी पुढाकाराने चहाचंही एक वेळापत्रक बनवलं आणि आमच्या सोसायटीत त्याला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. इतके सगळे पुढे येऊन उत्साहाने मदत करत होते. त्या तीन महिन्यांत संध्याकाळचा चहा कोण देणार किंवा आज यांना डबा द्यायला कोणीच नाही असं कधीच झालं नाही. उलट लोक वेटिंग लिस्टमध्ये असायचे. त्यासाठी आम्ही योग्य नियोजन केले होते. वेळापत्रक बनवून व्हॉट्सऍप समूहात शेअर केलं जायचं. त्यासाठी रिमाइंडर दिला जायचा. ते खूपच आनंददायी चित्रं होतं. वेगवेगळ्या संस्थांसाठी मदत केलीच, पण सोसायटीतल्या त्या जोडप्यासाठी आम्ही सोसायटीतील लोकांनी केलेली ही मदत जास्त समाधानकारक होती.

एरवी आपण छोटे छोटे राग, लोभ, द्वेश हे कुठेतरी मनात विनाकारण जपून ठेवलेले असतात. त्याचा अनुभव म्हणजे हा असुरक्षित, घाबरून टाकणारा काळ आहे. जेव्हा तुम्ही असुरक्षित असता तेव्हा अनेकदा तुम्ही आक्रमक, नकारात्मक होता, पण माझ्या आजूबाजूचा अनुभव पाहता या काळात दोन लोकांमधला राग, भांडण असेल ते सगळं विरून गेलं होतं. मला खात्री आहे की, छोटय़ा गावांमधून किंवा लहान वस्त्यांमधूनदेखील एकमेकांसाठी उभं राहण्याची प्रवृत्ती दिसत होती.

आपली प्रतिक्रिया द्या