Trailer – ‘इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ मध्ये झळकणार सिंघम; ट्रेलर प्रदर्शित

अजय देवगणच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण लवकरच ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रील्ससोबत लोकप्रिय शो ‘इनटू द वाइल्ड विथ बियर ग्रिल्स’ मध्ये स्टंट करताना दिसणार आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये सुपरस्टार रजनीकांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अक्षय कुमारनंतर आता अजय देवगणदेखील झळकणार आहे. ‘डिस्कव्हरी प्लस’ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’चा ट्रेलर शेअर केला आहे. हिंदी महासागरामध्ये चित्रीकरण झालेल्या या बहुप्रतीक्षित कार्यक्रमाची पहिली झलक डिस्कव्हरीने प्रदर्शित केली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ‘ये कोई खेल नही है’ असे अजय बोलताना दिसत आहे.

गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅन व्हसेस वाइल्ड’ या शोमध्ये बियर ग्रिल्ससोबत दिसले होते. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार अशा दिग्गजांचा देखील समावेश या शो मध्ये झाला होता. आता अभिनेता अजय देवगण या शोमध्ये सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद आहे. डिस्कव्हरी नेटवर्क आता या शोचा नवीन थरारक सीझन आणत आहे. अजय देवगणचा हा एपिसोड 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या एपिसोडमध्ये अजय देवगण आणि वाईल्ड आयकॉन बेअर ग्रिल्स एका साहसी व थरारक प्रदेशामधील विविध ठिकाणी कसे जातात, हे पाहायला मिळणार आहे.

‘इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ च्या प्रोमो रीलिजदरम्यान अजय देवगण आणि बियर ग्रिल्ससोबत एशिया डिस्कव्हरी इन्कच्या मॅनेजिंग डिरेक्टर मेघना टाटा उपस्थित होत्या. अजय देवगण याने या शोबाबतचे त्याचे अनुभव सांगितले. शोदरम्यान मला बऱ्याचदा समजत नव्हतं बियर काय करतोय, मी फक्त त्याला फॉलो करत होतो. या शोच्या शूटिंगमध्ये रिटेक नव्हता त्यामुळे काहीही घडू शकलं असतं, कारण आम्ही अनोळखी ठिकाणी होतो. अजयच्या मते हा अनुभव भीतीदायक तर होताच मात्र रोमांचकही होता. तसेच बेअर ग्रिल्सने पत्रकारांना हिंदुस्थानातील अनुभव कसा होता हे शेअर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या