खारघर दुर्घटनेतील चौकशीचा रोख कोकण विभागीय आयुक्तांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आता कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची चौकशी  करून अहवाल सादर करणार आहे.

खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक पातळीवर जी समिती नेमण्यात आली होती त्यांची चौकशी करून त्या ठिकाणची वस्तुस्थिती जाणून घेऊन आपला अहवाल सादर करणार आहे.

सरकारने नेमलेल्या एकसदस्यीय समितीने घटनेची संपूर्ण माहिती प्राप्त करून त्याबाबतची वस्तुस्थिती विषद करणे. सदर पुरस्कार वितरण सोहळय़ाच्या प्रयोजनासाठी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली जी स्थानिक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी ज्या यंत्रणांकडे कामे सोपवली होती त्याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुर्घटना झाल्यानंतर तातडीने मदतकार्य राबविणे आवश्यक होते त्याची वस्तुस्थिती नेमकी काय होती याचीही माहिती सरकारची समिती घेणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी-दक्षता घ्यावी याबाबतच्या शिफारशी सरकारला सुचविण्याचे आदेश पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून काढण्यात आले आहेत.