दिल्लीपुढे आज हैदराबादचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबादचे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत उद्या, 4 एप्रिलला दिल्ली कॅपिटलपुढे आव्हान असेल. तळाच्या फलंदाजांची हाराकिरी हा दिल्लीपुढील मुख्य प्रश्न असेल. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स संघांविरुद्ध दिल्लीने हातातल्या लढती गमावल्या होत्या. आता घरच्या मैदानावर हैदराबादला रोखण्यासाठी दिल्ली कॅपिटलला सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागणार आहे.

दिल्लीने मुंबई इंडियन्सला हरवून आयपीएलची सनसनाटी सुरुवात केली होती. दिल्लीने चारपैकी दोन लढती गमावल्या असून गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी आहेत. हैदराबादने तीनपैकी दोन लढती जिंकल्या आहेत. जॉनी बेअरस्टॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी बंगळुरूविरुद्ध दणकेबाज शतके झळकावली होती. हैदराबाकडे या तगडय़ा सलामीच्या जोडीसह विजय शंकर, युसूफ पठाण, मनीष पांडे, दीपक हुडा असा दमदार फलंदाजीक्रम आहे, मात्र दिल्लीकडे कॅगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट व इशांत शर्मा असा तिखट मारा करणारा गोलंदाजी ताफा आहे. शिवाय नेपाळच्या संदीप लामिछाने या फिरकीपटूकडूनही दिल्लीचा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

दिल्लीकडे पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कोलीन इनग्राम, ख्रिस मॉरिस व हनुमा विहारी अशी प्रतिभावान फलंदाजांची फळी आहे. मात्र हैदराबादच्या रशीद खान व मोहम्मद नबी या अफगाणी गोलंदाजीला दिल्लीचे फलंदाज कसे सामोरे जातात यावर बरेच काही अवलंबून असेल. शिवाय भुवनेश्वर कुमार व संदीप शर्मा हे गोलंदाजही हैदराबादच्या दिमतीला आहेत. त्यामुळे दोन तुल्यबळ संघात कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.

आजची लढत

सनरायझर्स हैदराबाद वि.

दिल्ली कॅपिटल (नवी दिल्ली)

थेट प्रक्षेपण रात्री 8 वाजता