… तर अर्ध्या सिझनपर्यंत ‘टॉप’वर असणारा दिल्लीचा संघ IPL मधून बाहेर होणार, असं आहे गणित

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला. प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणारा मुंबई पहिला संघ ठरला असून इतर 3 जागांसाठी चुरस कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघ प्ले ऑफच्या रेसमध्ये आहेत. मात्र अर्ध्या सिझनपर्यंत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दिल्लीवर आयपीएलमधून बाहेर होण्याचा धोका आहे.

पहिल्या 10 लढतीनंतर दिल्ली आरामात प्ले ऑफ गाठणार असे चित्र होते. मात्र आधी कोलकाता नाईट रायडर्स आणि नंतर सनरायझर्स हैद्राबादकडून मोठा पराभव सहन करावा लागल्याने दिल्लीचे गणित बिघडले आहे. दिल्लीचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर असून सलग दोन मोठे पराभव झाल्याने रनरेट देखील खराब झाला आहे.

दिल्लीच्या आगामी लढती

दिल्लीचे सध्या 12 लढतीत 14 गुण आहेत. प्ले ऑफ गाठण्यासाठी दिल्लीला आगामी दोन लढती पैकी एका लढतीत विजय आवश्यक आहे.

मात्र दिल्लीला आगामी लढतीत टॉप दोनमध्ये असणाऱ्या मुंबई आणि बंगळुरूचा सामना करावा लागणार आहे. 31 ऑक्टोबरला अबुधाबीला आणि 2 नोव्हेंबरला दुबईत या लढती खेळल्या जाणार आहेत.

… तर दिल्लीचे अवघड

दरम्यान, आगामी दोन लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यास दिल्ली कॅपिटल्सची परिस्थिती अवघड होणार आहे. दिल्लीला पंजाब आणि केकेआरकडून धोका असून हे दोन्ही संघ आगामी लढती जिंकल्यास दिल्लीचा पत्ता साफ होईल.

पंजाबचे सध्या 12 लढतीत 12 गुण आहेत. के.एल. राहुलच्या संघाला आगामी दोन लढतीत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा सामना करायचा आहे. अशा स्थितीत पंजाबने दोन्ही लढतीत विजय मिळवल्यास पंजाबचे 16 गुण होतील.

IPL 2020 – सूर्य तळपला, थेट विराटला भिडला; दोघांमधील ‘टशन’ कॅमेऱ्यात कैद

दुसरीकडे केकेआरला देखील दोन लढती खेळायच्या असून मॉर्गनच्या संघाने चेन्नई आणि राजस्थानचा पराभव केल्यास त्यांचेही 16 गुण होतील. या स्थितीत दिल्ली आगामी 2 लढतीत पराभूत झाल्यास त्यांचे 14 गुण राहतील आणि पंजाब, केकेआर प्ले ऑफमध्ये जाईल. तसेच बंगळुरू देखील प्ले ऑफ गाठेल. कारण दिल्लीला आगामी 2 लढतीपैकी 1 लढत बंगळुरू सोबत खेळायची आहे.

दिल्लीला खेळ सुधारावा लागणार

सुरुवातीच्या लढतीत पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मार्कस स्टोयनिस यांनी चांगला खेळ करत संघाला टॉपला नेले. मात्र गेल्या काही लढतीत यांचा गेम सुमार राहिला आहे. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंना खेळ सुधारावा लागेल, अन्यथा अर्ध्या सिझनमध्ये टॉपवर असतानाही प्ले ऑफ गाठण्यात अपयश येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या