IPL 2020 – ईशान किशनचे वादळी अर्धशतक, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने एकतर्फी विजय

शनिवारी झालेल्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला. मुंबईचा डावखुरा फलंदाज ईशान किशनने वादळी अर्धशतक झळकावले. या विजयामुळे मुंबई टॉपवर राहणार हे स्पष्ट झाले, तर दिल्लीच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 बाद 110 धावा केल्या. दिल्ली कडून एकट्या कर्णधार श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 25, तर ऋषभ पंत याने 21 धावा केल्या. इतर फलंदाज मुंबईच्या धारधार गोलंदाजीपुढे टिकू शकले नाही.

बुमराह-बोल्टचा ‘षटकार’

मुंबईच्या गोलंदाजानी सुरुवातीपासून दिल्लीवर पकड मिळवली. दिल्लीच्या धावफलकावर 1 धाव असताना शिखर धवन शून्यावर बाद झाला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले.

मुंबई कडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी एकत्रित विकेट्सचा ‘षटकार’ ठोकला. दोघांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. नाथन कुलटर नाईल आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 1 बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.

मुंबईचा एकहाती विजय

दिल्लीने विजयासाठी दिलेले 111 धावांचे माफक आव्हान मुंबईने 1 गड्याच्या मोबदल्यात 14.2 षटकात पूर्ण केले. सलामीवीर ईशान किशन याने वादळी खेळी करत 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 26 तर सूर्यकुमार यादवने नाबाद 12 धावांचे योगदान दिले.

रोहित बाहेरच

मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आजही मैदानात उतरला नाही. सलग चौथ्या लढतीत त्याला आराम देण्यात आला. त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा विस्फोटक खेळाडू किरोन पोलार्ड याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

आपली प्रतिक्रिया द्या