IPL 2020 – गेल-मनदीपचे अर्धशतक, पंजाबचा सलग पाचवा विजय; केकेआरचा 8 विकेट्सने पराभव

सोमवारी झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. पंजाबचा हा सलग पाचवा विजय आहे. यामुळे के.एल. राहुलच्या संघाने प्ले ऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.

विजयासाठी 150 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबला के.एल. राहुल आणि मनदीप सिंहने 47 धावांची सलामी दिली. ऑरेंज कॅपधारक राहुल 28 धावा काढून बाद झाला.

मनदीप-गेलची भागीदारी

राहुल बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल याने आपल्याच अंदाजात फटकेबाजी केली. गेल आणि राहुल यांच्यात 100 धावांची भागीदारी झाली.

विजयासाठी 3 धावा हव्या असताना गेल बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 5 उत्तुंग षटकार ठोकले.

मनदीपचे अर्धशतक

वडिलांच्या निधनानंतर दुसरा सामना खेळणाऱ्या मनदीप सिंह याने दमदार अर्धशतक झळकावले. अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने 56 चेंडूत 66 धावा केल्या.

अर्धशतक झाल्यावर त्याने हात उंचावून आपल्या दिवंगत वडिलांना अभिवादन केले. यावेळी संपूर्ण संघ टाळ्या वाजवून त्याला पाठिंबा देत होता. ब्रेकमध्ये खुद्द कर्णधार राहुल मैदानात आला आणि त्यानेही मनदीपची पाठ थोपटली.

https://twitter.com/IPL/status/1320780948573569027?s=19

कोलकाताची अडखळत सुरुवात

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. केकेआरने पहिले 3 फलंदाज अवघ्या 10 धावांत गमावले. राणा आणि कार्तिक शून्यावर, तर त्रिपाठी 7 धावांवर बाद झाले.

गिल-मॉर्गनने सावरले

तरुण खेळाडू शुभमन गिल आणि कर्णधार मॉर्गनने केकेआरचा डाव सावरला. दोघात 81 धावांची भागीदारी झाली. मॉर्गन 40 धावांवर बाद झाल्यानंतर केकेआरचा डाव कोसळला.

गिलने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावले. बाद होण्यापूर्वी त्याने 57 धावा केल्या. पंजाबकडून शमीने सर्वाधिक 3, जॉर्डन आणि बिश्नोईने प्रत्येकी 2, तर एम. अश्विन आणि मॅक्सवेलने प्रत्येकी 1 बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या