
आयपीएलचा साखळी फेरीचा टप्पा मंगळवारी संपेल. पण अद्याप प्ले ऑफचा तिढा अद्याप सुटलेला नाहीए. मुंबई इंडियन्सने नऊ विजयांसह गुणतालिकेतील पहिले स्थान कायम ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सोमवारी होणाऱर्या लढतीतील विजेता प्ले ऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल, पण उर्वरित दोन स्थानांसाठी उद्याच्या लढतीपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. याप्रसंगी विविध समीकरणांवर टाकलेला हा प्रकाशझोत…
समीकरण तिसरे
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सध्या चौथ्या स्थानावर विराजमान आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ उद्या पराभूत झाल्यास कोलकाता नाईट रायडर्सचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा होईल. पण सनरायझर्स हैदराबादचा संघ या लढतीत विजयी झाल्यास त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील लढतीच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. या लढतीत मोठय़ा फरकाने जो संघ हरणार तोच संघ बाहेर जाईल आणि कोलकाता नाईट रायडर्सची प्ले ऑफमध्ये एण्ट्री होईल.
समीकरण दुसरे
सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी होणाऱया लढतीत मुंबई इंडियन्सला हरवले तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा 13 लढतींनंतर 0.555 इतका चांगला नेटरनरेट आहे. त्यामुळे विजयानंतर त्यांना थेट तिसऱया क्रमांकावरही पोहोचता येणार आहे.
समीकरण पहिले
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील लढतीत डेव्हिड वॉर्नरच्या ब्रिगेडला विजय मिळवावाच लागणार आहे. या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाईट रायडर्स जास्त विजयांसह प्ले ऑफमध्ये पोहोचतील.
मुंबईचा संघ प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचा संघ शानदार खेळ करतोय. प्ले ऑफच्या आधी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय यावेळी संघ व्यवस्थापन घेऊ शकते. जसप्रीत बुमराह, ट्रेण्ट बोल्ट, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांडय़ा यांना विश्रांती देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही. रोहित शर्मा ही लढत खेळणार की नाही याबाबतही अद्याप अनिश्चितता आहे. बेंचवर बसलेल्या खेळाडूंना यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघात संधी देण्यात येईल ही शक्यताही नाकारता येत नाही.
- आजची लढत – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, रात्री 7.30 वाजता)


























































