
आयपीएल 2023 च्या 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 4 गडी राखून पराभव केला आहे. सलग पाच पराभवानंतर आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला विजय आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सलग तिसरा पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत सर्व गडी गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 4 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला.
128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि शॉ यांनी दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी झाली. निराशाजनक खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉ बाद झाला. त्याने 11 चेंडूत 13 धावा केल्या. मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी केली. दरम्यान, राणाने मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. फिलिप सॉल्टही 5 धावा करून बाद झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केले. पण तो 41 चेंडूत 57 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. खराब शॉट खेळून मनीष पांडे बाद झाला. मनीष पांडेने 23 चेंडूत 21 धावा केल्या. यानंतर अक्षर पटेलने 22 चेंडूत 19 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
























































