
3 बाद 33 अशी बिकट अवस्था असताना नितीश राणा आणि फिनीशर रिंकू सिंह यांनी केलेल्या 99 धावांच्या झुंजार भागीने कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नईला दणका दिला. कोलकात्याने 9 चेंडू आणि सहा विकेट राखत विजय मिळविला आणि आयपीएलच्या प्ले ऑफ प्रवेशाच्या आपल्या अंधुक आशा कायम ठेवल्या. कोलकात्याच्या या विजयामुळे प्ले ऑफसाठी पहिल्या आठही संघांचे आव्हान कायम असून केवळ दिल्ली आणि हैदराबाद हे दोन संघ बाद झाले आहेत.
चेन्नईला आजच्या विजयामुळे अव्वल स्थान काबीज करण्याची संधी होती, पण कोलकात्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. चेन्नईचे 147 धावांचे माफक लक्ष्य कोलकात्यासाठी जबर आव्हान ठरणार अशी अपेक्षा होती. चेन्नईच्या दीपक चहरने आपल्या सलग तीन षटकांत 3 विकेट घेत चेन्नईला सनसनाटी सुरुवात करून दिली. यानंतर कोलकाताची फलंदाजी चेन्नई लवकर गुंडाळेल, असे चित्र होते. पण नितीश राणा आणि रिंकू सिंहने तब्बल 14 षटके चेन्नईच्या आक्रमणाला तोंड देत 99 धावांची भागी रचली आणि कोलकात्याला दणदणीत विजयाच्या उंबरठय़ावर नेले. रिंकूने 43 चेंडूंत 3 षटकार आणि 4 चौकार ठोकत 54 धावा चोपल्या. राणानेही 57 धावांची अप्रतिम खेळी करत कोलकात्याच्या विजयावर 19 व्या षटकांतच शिक्कामोर्तब केले.
त्याआधी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना डेव्हन कॉन्वेच्या 30 आणि शिवम दुबेच्या 34 चेंडूंतील नाबाद 48 धावांमुळे 6 बाद 144 अशी मजल मारली होती. 11 षटकांत 72 धावांवर अर्धा संघ बाद झाल्यावर शिवम आणि जाडेजाने 52 चेंडूंत 68 धावांची भागी रचत संघाला 140 पर्यंत नेले. जाडेजाला 20 धावांसाठी 24 चेंडू खेळावे लागले. कोलकात्याकडून वरुण आणि नरीनने दोन-दोन विकेट मिळविल्या.


























































