
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 16 व्या हंगामासाठी 23 डिसेंबरला कोची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव होणार आहे. सर्व 10 फ्रेंचायझी संघाच्या मोर्चेबांधणीसाठी चांगले क्रिकेटर विकत घेण्यासाठी हाताच्या बाह्या सावरून सरसावले आहेत. कुठल्या संघात कुठले खेळाडू जातात अन् कोणावर किती बोली लागते याकडे जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.
यावेळी 2023 साठीच्या लिलावात 405 क्रिकेटपटू उतरणार आहेत. यात 273 हिंदुस्थानी, तर 132 परदेशी खेळाडू आहेत. 132 परदेशी खेळाडूंपैकी 4 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. एकूण 119 कॅप्ड आणि 282 अनकॅप्ड खेळाडू लिलावात सहभागी होतील. सर्व संघ एकूण 87 खेळाडू खरेदी करू शकतात, ज्यामध्ये जास्तीत जास्त 30 परदेशी खेळाडू असतील.
गझनफर युवा, तर मिश्रा वयस्कर खेळाडू
अफगाणिस्तानचा अल्लाह मोहम्मद गझनफर हा आयपीएल 2023 च्या लिलावासाठी निवडलेला सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताचा ऑफस्पिनर आहे. लिलावात सर्वात वयस्कर खेळाडू टी-20 दिग्गज अमित मिश्रा आहे. 40 वर्षीय अमित मिश्राने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (2008), डेक्कन चार्जर्स (2011) आणि सनरायझर्स हैदराबाद (2013) या तीन वेगवेगळय़ा संघांसाठी हॅट्ट्रिक घेतली आहे. लिलावाच्या शेवटी प्रत्येक संघात किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू असावेत. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 8 विदेशी खेळाडू असू शकतात.
लिलावापूर्वी सर्व 10 संघांकडे असलेली रक्कम
सनरायझर्स हैदराबाद ः 42.25 कोटी, पंजाब किंग्ज ः 32.2 कोटी, लखनौ सुपर जायंट्स ः 23.35 कोटी, मुंबई इंडियन्स ः 20.55 कोटी, चेन्नई सुपरकिंग्ज ः 20.45 कोटी, दिल्ली कॅपिटल्स ः 19.45 कोटी, गुजरात टायटन्स ः 19.25 कोटी, राजस्थान रॉयल्स ः 13.2 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः 8.75 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स ः 7.05 कोटी

























































