IPL 2024 – राहुल – पंत यांच्यात ‘काँटे की टक्कर’

लोकेश राहुल व ऋषभ पंत या टीम इंडियातील दोन खेळाडूंमध्ये आयपीएलमध्ये शुक्रवारी ‘काँटे की टक्कर’ बघायला मिळणार आहे. फॉर्मात असलेल्या राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सला पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स रोखणार काय? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.

लखनऊच्या संघाने चारपैकी तीन लढती जिंकून आयपीएलमधील आपला दबादबा कायम ठेवला आहे. याउलट पंतच्या जबरदस्त कामगिरीनंतरही दिल्लीला पाचपैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ सध्या तळाला आहे. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत येण्यासाठी दिल्लीला आता प्रत्येक विजय महत्त्वाचा असेल. खराब गोलंदाजी दिल्लीची मुख्य डोकेदुखी ठरत आहे. एकटा अक्षर पटेल पंजूष गोलंदाजी करतोय. लखनऊसारख्या तगडय़ा संघाला रोखण्यासाठी खलील अहमद व इशांत शर्मा या वेगवान जोडगोळीला आपली कमाल दाखवावी लागणार आहे. दुखापतीनंतर पुनरागमन केलेला मुकेश कुमारही अद्याप प्रभावी गोलंदाजी करू शकलेला नाहीये. सुमित कुमार, रसिक डार व एन्रीच नॉर्खिया यांनाही मागील चुका टाळून लखनऊच्या फलंदाजीला लगाम घालण्यासाठी टिच्चून मारा करावा लागेल.

पंतला फलंदाजांच्या साथीची गरज

कर्णधार ऋषभ पंत व ट्रिस्टन स्टब्स यांनीच आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचा किल्ला लढविलेला आहे. आता इतर फलंदाजांकडून त्यांना साथ मिळालायला हवी. पृथ्वी शॉ चांगली फलंदाजी करतोय, पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरत आहे. अभिषेक पोरेल वगळता इतर अनपॅप्ड हिंदुस्थानी खेळाडूंनाही अद्याप चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये. त्यामुळे लखनऊसारख्या संघाला हरविण्यासाठी दिल्लीला फलंदाजी व गोलंदाजीमध्ये सरस कामगिरी करावी लागणार आहे.

लखनऊचे पारडे जड

दिल्ली कॅपिटल्सपेक्षा लखनऊ सुपर जायंट्स संघाचे पारडे जड दिसतेय. कारण ताशी दीडशे प्रति किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयांक यादवच्या गैरहजेरीत त्याची उणीव इतर गोलंदाजांनी भासू दिली नाही. त्याच्या जागेवर संधी मिळालेल्या यश ठाकूरने, तर गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत 5 विकेट टिपत विजयात मोलाची भूमिका बजावली होती. याचबरोबर नवीन उल-हक, कृणाल पंडय़ा, रवी बिष्णोई यांनीही आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी केलेली आहे. शिवाय कर्णधार लोकेश राहुल व क्विंटंन डिकॉक अशी जबरदस्त सलामीची जोडी लखनऊच्या दिमतीला आहे. डिकॉकने आतापर्यंत दोन अर्धशतके ठोकली आहेत. निकोलस पूरण, मार्कस स्टोईनिस असे मॅचविनर फलंदाजही लखनऊच्या ताफ्यात आहे, मात्र देवदत्त पडिक्कलला सूर कधी गवसणार ही एकच चिंता या संघाला सतावत आहे. कोलकात्याकडून झालेला दारुण पराभव वगळता लखनऊच्या संघात आतापर्यंत सर्व काही आलबेल आहे. त्यामुळे सर्वच आघाडय़ांवर सरस असलेल्या या संघाला रोखण्यासाठी दिल्लीलाही सर्वच आघाडय़ांवर चांगली कामगिरी करावी लागणार आहे.