अखेर जैसवाल ‘यशस्वी’! सात अपयशी खेळीनंतर प्रथमच शतकी हल्ला

संदीप शर्माने 18 धावांत मुंबईचा टिपलेला निम्मा संघ आणि त्यानंतर सात अपयशी खेळींनंतर जबरदस्त शतकी पुनरागमन करण्यात जैसवाल यशस्वी ठरल्यामुळे परतीच्या लढतीतही मुंबईचा 9 विकेटनी धुव्वा उडवत राजस्थानने आयपीएलमध्ये विजयाची दुसऱयांदा हॅटट्रिक साजरी केली आणि स्पर्धेतील सातव्या विजयासह आपले अव्वल स्थान अबाधित ठेवले.

मुंबईचे 180 धावांचे आव्हान यशस्वी जैसवाल आणि जोस बटलरच्या झंझावातासमोर अत्यंत छोटे भासले. 8 षटकांत 74 धावांची जैसवाल-बटलरने सलामी दिल्यानंतर जैसवाल-सॅमसनने त्याच वेगाने मुंबईच्या गोलंदाजांना चोपत 109 धावांची अभेद्य भागी रचत 19 व्या षटकांत राजस्थानचा सहजसुंदर विजय मिळवून दिला. मुंबईने आज सोप्पे झेल सोडल्यामुळे राजस्थानसमोर मुंबईच्या गोलंदाजांचे काहीही चालले नाही. आयपीएलमध्ये पहिल्या सात सामन्यात 24,5,10, 0,24,39,19 अशा अपयशी खेळींमुळे टी-20 वर्ल्ड कप संघनिवडीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या यशस्वीने आज 104 धावांची शतकी खेळी करत निवड समितीचे लक्ष वेधण्यात यश मिळवले. त्याने 60 चेंडूंत 7 षटकार आणि 9 चौकारांसह आपली खेळी साकारली. सॅमसन 38 धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी मुंबईच्या डावाला संदीप शर्माने सुरूंग लावला. पाच सामन्यांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या संदीपने आधी इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला बाद करून मुंबईची 3 बाद 20 अशी केविलवाणी अवस्था केली होती. मग आलेल्या तिलक वर्मा आणि मोहम्मद नबीने 32 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर तिलक वर्मा आणि नेहाल वढेराने दृष्ट लागण्याजोगी फटकेबाजी करताना 99 धावांची भागी रचून मुंबईला सुस्थितीत आणले. वढेराने24 चेंडूंच्या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार ठोकत 49 धावा केल्या. मात्र त्यानंतर संदीप शर्माने आपल्या गोलंदाजीवर मुंबईला आणखी तीन धक्के दिले. तिलक वर्माचा झंझावात 65 धावांवर थांबला. मग हार्दिक पंडया, टीम डेव्हिड या आक्रमकांना संघाच्या धावसंख्येत फार धावा जोडता आल्या नाहीत. त्यामुळे 200 धावांची अपेक्षा असलेली मुंबईत 179 धावांवरच थांबली.