बंगळुरू–राजस्थान विजयाचे खाते उघडण्यासाठी भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जयपूर

 ‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 12 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व राजस्थान रॉयल्स या दोन संघांना अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. लागोपाठच्या तीन पराभवांमुळे गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स सातव्या तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आठव्या स्थानावर आहेत. रसातळाला असलेले हे दोन संघ मंगळवारी एकमेकांना भिडणार असून कोण विजयाचे खाते उघडणार याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल.

मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे बंगळुरूचे खेळाडू हताश झाले आहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला चेन्नई सुपर किंग्सकडून निसटता पराभव पत्करावा लागला. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली अद्याप आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करू शकलेला नाही. कोहली व एबी डिव्हिलियर्स हे जगातील सर्वोत्तम फलंदाज दिमतीला असूनही बंगळुरूला पराभवाच्या हॅटट्रिकला सामोरे जावे लागले. राजस्थानला तीन लढती गमवाव्या लागल्या असल्या तरी त्यांनी प्रत्येक लढतीत तुल्यबळ खेळ केला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजस्थानकडे कर्णधार अजिंक्य रहाणेसह जोश बटलर, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, जोफ्रा अर्चर अशी खोलवर फलंदाजी आहे. त्यामुळे उद्या कोणता संघ विजयाची बोहणी करण्यात यशस्वी होतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.