श्रीदेवींचा झाला होता खून, पोलीस अधिकाऱ्याचा दावा

164

सामना ऑनलाईन । कोची

अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघाती नसून तो एक खून होता, असा खळबळजनक दावा एका आयपीएस अधिकाऱ्याने केला आहे. ऋषिराज सिंह असं या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव असून यासाठी त्यांनी त्यांच्या एका दिवंगत डॉक्टर मित्राचा हवाला दिला आहे.

न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, सिंह हे केरळ येथे पोलीस महासंचालक (कारागृह) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचे दिवंगत मित्र आणि न्यायवैद्यक शल्यविशारद असलेल्या डॉ. उमादथन यांच्या हवाल्याने हा खळबळजनक दावा केला आहे. बुधवारी डॉ. उमादथन यांचं निधन झालं. त्यांना समर्पित करणारा लेख लिहिताना सिंह यांनी हा दावा केला आहे. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. उमादथन यांना श्रीदेवी यांच्या मृत्युविषयी सिंह यांनी विचारलं होतं. तेव्हा उमादथन यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचं म्हटलं होतं. एका फुटाच्या बाथटबमध्ये मद्यधुंद व्यक्ती बुडू शकत नाही. कुणीतरी जाणूनबुजून बुडवल्याशिवाय बुडणं शक्यचं नाही. श्रीदेवी यांच्याबाबतीतही हेच घडलं होतं. त्यावेळी त्यांच्या खोलीत कुणीतरी अन्य व्यक्तिही होती ज्याने श्रीदेवी यांचे पाय धरून ठेवले आणि मग त्यांचं डोकं पाण्यात बुडवण्यात आलं, अशी माहिती या लेखात सिंह यांनी दिली आहे. सिंह यांच्या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

श्रीदेवी यांचा मृत्यू 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबई येथील त्यांच्या हॉटेलरूमच्या बाथटबमध्ये बुडून झाला होता. श्रीदेवी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मोहित मारवाह या त्यांच्या नातलगाच्या लग्नासाठी दुबईत दाखल झालं होतं. श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर त्यांचे पती बोनी कपूर यांची दुबई पोलिसांनी चौकशीही केली होती. संपूर्ण तपास केल्यानंतर पोलिसांनी हा मृत्यू अपघाती असल्याचं जाहीर केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या