शेतकऱ्यांचे डेथ वॉरंट काढणारे हेच गॅरंटीवाले सरकार आहे काय; संजय राऊत कडाडले

सध्या शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहे. अशावेळी त्यांनी सरकारकडे दाद मागायची नाही, आपल्या समस्या, मागण्या त्यांनी सरकारकडे मांडायच्या नाहीत, तर शेतकऱ्यांनी कुठे जायाचे, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी यांची गॅरंटी होती. तसेच एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्याचे काय झाले. आता शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीला येत आहेत. तर मोदी सरकार त्यांचे डेथ वॉरंट काढत आहेत. हेच गॅरंटीवाले सरकार आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारात जाऊनही आपली मागणी मांडत होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनीही ब्रिटिशांच्या दरबारात जाऊन व्यथा मांडल्या आहेत. शेतकऱ्यांचा आसूड कडाडला आहे. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत. देशाच्या राजधानीत जाता येत नाही. मुंबईत येता येत नाही, ही अंत्यत गंभीर बाब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आणि समस्यांबाबत आम्ही चर्चा करू आणि पुढील निर्णय घेऊ, असे संजय राऊत म्हणाले.

कोणतेही पाच प्रकल्प असे दाखवा, जे मोदी यांनी केले आहेत. मोदी यांनी 10 वर्षात ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे, त्याची सुरुवात 2014 पूर्वीच झाली होती. बह्मपुत्रा पूल, जम्मू कश्मीरमधील प्रकल्प किंवा संरक्षण क्षेत्रातील प्रकल्प यांची सुरुवात 2014 पूर्वीच झाली होती. मोदी यांनी फक्त या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचे काम केले आहे. मोदी आणि त्यांचे सरकार खोटे बोलत आहेत. खोट्याच्या आधारावरच त्यांचे सरकार स्थापन झाले आहे. आता त्यांच्याकडे फक्त दोन-तीन महिने आहेत. या काळात त्यांना हवे तेवढे त्यांनी खोटे बोलून घ्यावे.

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजीनामा देत एखाद्या पक्षात सहभागी होत असतील तर ते ज्या खुर्चीवर बसले होते, तेथे ते न्याय करत नव्हते, तर एखाद्या पक्षाचे काम करत होते, असेही संजय राऊत म्हणाले. प्रकाश आंबोडकर आणि वंचित बहुजन आघाडीबाबत 6 तारखेला होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या बैठकीत प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. आज संविधान, लोकशाही आणि संसद धोक्यात आहे. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत राज्यात मजबूत आघाडी स्थापन करणार आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा संकटात असताना प्रकाश आंबेडकर असे कोणतेही काम करणार नाहीत, ज्यामुळे अशा विरोधी विचारधारेला बळ मिळेल.

मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा मान्य करते, असे दिसत नाही. वंचित, शोषित, गरीब, शेतकरी, सामान्य नागरिक यांना त्यांचे हक्क देणारी डॉ. बाबासाहेब यांची विचारधारा आहे. मात्र, मोदी या वर्गाचे काहीच एकत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहेत आणि ते आमच्यासोबतच राहतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. मायावती या भाजपासाठी काम करत असून त्या बहुजनांची दिशाभूल करत आहेत, असा शिक्का त्यांच्यावर आहेत. प्रकाश आंबेडकर असे करणार नाही. हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी आमच्यात एकमत झाले आहे. महाराष्ट्र आमि देश हुकूमशाहीमुक्त करणे, हेच आमचे ध्येय आहे.

भाजपमध्ये हिंमत असती तर ते स्वतःच्या ताकदीवर लढले असते. मात्र, इतर पक्षातील नेत्यांवर दबाव टाकत त्यांना आपल्याकडे खेचून घेत, त्यांना उमेदवारी देत आहेत. भाजपकडे स्वतःचे असे काय आहे. भाजप काँग्रेसवर आरोप करते आणि काँग्रेसच्याच नेत्यांना आपल्या पक्षात घेत त्यांना उमेदवारी देतात, असेही राऊत म्हणाले.