इशानने आधीच हार मानलीय! टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यताच नसल्याची देहबोली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 34 चेंडूंत 69 धावांची खेळी करणारा इशान किशन अनेक महिन्यांनंतर प्रथमच पत्रकारांसमोर आला, पण त्याच्या देहबोलीने आधीच हार मानल्याचे दिसून आले. आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणे हे माझ्या हातात नसल्याचे सांगून आपली निवड होणार नसल्याचे त्याने संकेत दिले आहेत.

गुरुवारी बंगळुरूविरुद्ध इशान किशनच्या ज्या आक्रमकतेने खेळला, त्याचा खेळ पाहून वाटलं की, सहा महिन्यांपूर्वी हरवलेला इशान पुन्हा मैदानात परतला आहे. त्याचा झंझावाती खेळामुळे त्याच्यासाठी हिंदुस्थानी संघाचे द्वार उघडले जाऊ शकते याची त्याला जाणीवही झालेली असावी, पण पत्रकार परिषदेत त्याचा नकारात्मक दृष्टिकोन पाहता त्याने आधीच हार मानल्याचे वारंवार दिसून आले. तो संघात पुनरागमन करू शकतो. टी-20 वर्ल्ड कपही खेळू शकतो, याबाबत त्याच्या मनात कोणताही विचार नव्हता. मुळात संघात निवडीबाबत सध्या कोणताही विचार नसल्याचे सांगून त्याने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का दिला आहे.

इशानची बॅट चित्र बदलू शकते

इशानच्या बॅटीत जान आहे. त्याच्या फलंदाजीतही अफाट ताकद आहे, क्षमता आहे. तो कोणताही सामना फिरवू शकतो. तो जबरदस्त यष्टिरक्षकही आहे. तो धडाकेबाज सलामीवीर आहे. त्याला तडकाफडकी करारातून काढून टाकण्यात आल्यामुळे त्याला टी-20 वर्ल्ड कपचाही विसर पडलेला आहे. आयपीएल ही टी-20 वर्ल्ड कपची निवड चाचणी आहे आणि यात ज्याची बॅट बोलेल त्याचीच संघात चालेल याची जाणीव असूनही इशानने स्वताहूनच आपले नाव काढून टाकल्याचे चित्र समोर उभे राहिले आहे. सध्या आगामी वर्ल्ड कपसाठी ऋषभ पंत आघाडीवर असला तरी संजू सॅमसन आणि तोसुद्धा फार मागे नाही. जो यष्टिरक्षक आयपीएलमध्ये सर्वात जोरदार आणि शानदार कामगिरी करेल, त्याचीच निवड समिती निवड करेल. इशानने गेल्या पाच सामन्यांत 69, 42, 16, 34, 0 अशा खेळ्या केल्या आहेत. जर त्याची बॅट पंत आणि संजूपेक्षा वरचढ कामगिरी करते तर त्याला संघातून कुणी माई का लाल काढू शकत नाही, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ क्रिकेटपटूने व्यक्त केलीय.

इशानची मानसिकता बदललीय

अचानक दक्षिण आफ्रिका दौऱयातून घेतलेला ब्रेक, त्यानंतर बीसीसीआयने पेंद्रिय करारातून वगळलेले नाव यामुळे गेले काही दिवस इशान किशन मानसिकदृष्टय़ा खचला होता. त्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांपासूनच दूर राहणे पसंत केले होते, मात्र काल तो पत्रकारांसमोर आला तो वेगळय़ाच मानसिकतेने. त्याच्यात खूप बदल झाल्याचे दिसले तरी त्याने संघात पुनरागमन करण्याबाबत केलेल्या नकारात्मक वक्तव्यामुळे तो अजूनही दडपणाखालीच असल्याचे जाणवले आहे. संघाचा अविभाज्य घटक असलेली एक व्यक्ती अचानक संघाबाहेर गेल्यावर पुन्हा संघात येण्यासाठी जीवापाड धडपडते, पण इशानने अशी कोणतीही धडपड अद्याप दाखवलेली नाही. आपल्यावर झालेल्या कारवाईला आपली बॅटच उत्तर देईल, अशी वक्तव्य देणे त्याने टाळत अत्यंत सामान्य उतरे देत प्रत्येक प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे.