कोरोनाग्रस्तांशी संपर्कामुळे शिरोळ तालुक्यात घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्लामपूर,वडगांव याठिकाणी मिळून आलेल्या कोरोनाग्रस्तांशी कुरूंदवाड शहरातील एका कंटुबाचा संपर्क आल्याने शिरोळ तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वडगांवमधील त्या व्यक्तीचा प्रवास जयसिंगपूर-कुरूंदवाड झाल्याने परिसरातील अनेक गावांनी धास्ती घेतली आहे.

दरम्यान, संचारबंदीमुळे सलग सहाव्या दिवशी शुकशुकाट होता. शिरोळ, जयसिंगपूर , कुरूंदवाड नगरपालिकेसह 42 ग्रामपंचायतींनी किराणा , भाजीपाला, दूध घरोघरी पोहच करण्यासाठी नियोजन केले आहे. पुणे, मुंबईसह देशभरातून आलेल्या नागरिकांची संख्या आता 5434 वर पोहचली आहे.

संचारबंदी असल्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असून या मार्गावरुन जाणाºया वाहनधारकांना रोखण्यात येत होते. राज्य, जिल्हा तसेच गावोगावी सीमाबंदी करण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.

..जयसिंगपुरात भाजी विक्री बंद पाडली

शिरोळ तालुक्यात गावांनी प्रवेशबंदी केलेली आहे. तरीदेखील कांही नागरिकांकडून मोटारसायकलला कॅरेट अडकवून शेतकरी आहे असे सांगून विनाकारण प्रवास केला जात आहे,तर कांहीजण दुध वाहतूकीच्या वाहनामध्ये बसून बाहेरगावी जात आहेत.दरम्यान,जयसिंगपूर शहरात ३१ मार्चपर्यंत भाजी विक्री बंद असतानाही शाहूनगरमध्ये सुरु असलेली भाजी विक्री पालिकेच्या कर्मचा-यांनी बंद पाडली.

आरोग्य यंत्रना सतर्क
एकूण २९० आशास्वयंसेविका,३० आरोग्य सेवक,३७ आरोग्य सेविका,१६ आरोग्य सहाय्यक,१७ वैद्यकीय अधिकारी पूर्ण क्षमतेने काम करत असून ७ रूग्णवाहिका सेवेत उपलब्ध आहेत.रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आल्यास आयसोलेशन विभाग म्हणून शिरोळ ग्रामीण रूग्णालयात १४ बेडची आणि दत्तवाड ग्रामीण रूग्णालयात १५ बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.