गाझातील रेफ्युजी कॅम्पवर इस्रायलचा हल्ला, 50 दहशतवादी मारले गेल्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 26 दिवसांपासून सुरू असलेले इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत 8 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने गाझापट्टीतील हवाई हल्ले तसेच जमिनीवरील कारवाई वाढवली असून  बुधवारी इस्रायलने गाझातील सर्वात मोठय़ा रेफ्युजी कॅम्पवर हल्ला केला. या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहीन बियारीसह 50 दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. याच हल्ल्यात 7 ओलिसांना जीव गमवावा लागला. त्यातील तीन नागरिक इतर देशांचे होते. दरम्यान, हमाससोबत झालेल्या चकमकीत इस्रायलचे 11 सैनिक मारले गेले. यात हिंदुस्थानी वंशाच्या 20 वर्षीय हलेल सोलोमन याचाही समावेश असल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. दुसरीकडे अमेरिकेचे कमांडो इस्रायलमध्ये उतरले असून ओलीसांना सोडवण्यासाठी ऑपरेशन राबवणार आहेत.

दुसरीकडे जखमी चारशे निर्वासितांना राफा सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाईल जेणेकरून त्यांना उपचार घेता येईल, असे इजिप्तने म्हटले आहे.

युद्धात हुतीची उडी

बुधवारी येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रs डागली. याशिवाय ड्रोन बॅलेस्टिक आणि क्रुझ क्षेपणास्त्रेही इस्रायलवर डागण्यात आल्याचे हुतीचे प्रवत्ते याह्या यांनी स्पष्ट केले आहे.