मलेशियाचा उघडपणे हमासला पाठिंबा, पंतप्रधान म्हणाले आम्ही हमाससोबत आहोत आणि राहू…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्त्रायल पॅलेस्टाईनच्या युद्धात अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला असताना काही देशांनी हमासचे समर्थन केले. यात आता मलेशियानेही उडी घेतली आहे. मलेशियानेही हमासला उघडपणे पाठिंबा दिला असून काही झाले तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि राहू असे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी संसदेत दिले.

अन्वर इब्राहिम यांनी इस्त्रायल-हमासच्या युद्धात उडी घेत हमासची बाजू घेतली आहे. ते म्हणाले, हमासला गाझाच्या लोकांनी निवडले आहे आणि मलेशिया हमाससोबत असून त्यांच्यासोबत कायम असणार आहेत. आम्ही पाश्चिमात्य देशांच्या दबावाखाली येऊन हमासवर टीका करणार नाही. इब्राहिम यांनी सोमवारी मलेशियाच्या संसदेमध्ये सांगितले की, बैठकीमध्ये पाश्चमात्य देशाचे अधिकारी सारखे हमासचा निषेध करण्याबाबत बोलत होते. मात्र आमचे सरकार पाश्चिमात्य देशांशी सहमत नाही. इस्रायलवर शनिवारी केलेल्या रॉकेट्स हल्ल्यानंतर इस्लामिक देश हमाससोबत उभे आहेत. तर मलेशिया हमाससोबत आहे. अनवर इब्राहीम यांनी सांगितले की, ‘मी पाश्‍चिमात्य देशांना सांगितले आहे की, हमाससोबतचे आमचे संबंध हे आमचे धोरण आहे आणि भविष्यातही हे संबंध कायम राहतील. अशा प्रकारे, आम्ही पाश्चात्य देशांच्या बळजबरीच्या विचारांशी सहमत नसल्याचे सांगितले.

7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर 5000 रॉकेट्स डागले आणि इस्रायलवर मोठा हल्ला केला. पाश्चिमात्य देशांनी हमासच्या या हल्ल्याचा निषेध केला आणि शिवाय अन्य देशांना इस्रायलला समर्थन करण्याचा आग्रह केला. इस्रायलच्या अधिकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हमास दहशतवाद्यांनी इस्रायलवर हवा, जमिन आणि समुद्राच्या माध्यमातून  हल्ला करत 1400 लोकं मारली ज्यामध्ये अधिक लोकं सामान्य नागरीक होते. पॅलिस्टाईन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गाझावर इस्रायलच्या हल्ल्यात 2750 लोक मारले गेले तर जवळपास 10 हजार लोकं जखमी झाले आहेत.