घाबरू नका, आपला संसार पुन्हा उभा करू! रेल्वेखाली दोन्ही पाय गमावलेल्या जगन जंगलेच्या पत्नीची जिद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगावर अक्षता पडून फक्त तीनच महिने उलटले. नव्या संसाराला नुकतीच सुरुवात झालेली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सुखी जीवनाची स्वप्ने पाहणाऱया जगन जंगले याचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेले आणि अवघे भावविश्व चिरडून गेले. पण याही दुःखाच्या संकटात जगनची पत्नी रूपाली ठामपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. घाबरू नका.. हेही दिवस निघून जातील. तुम्ही फक्त लवकर बरे व्हा.. आपला संसार पुन्हा उभारू आणि संपूर्ण कुटुंबाला आधार देऊ, अशा शब्दांत तिने आपली जिद्द दाखवली आहे. रूपालीचे हे धैर्य तसेच संकटावर मात करण्याचे धाडस बघून रुग्णालयातील सर्वांचेच हृदय हेलावले.

कल्याणमध्ये राहणारा 31 वर्षीय जगन जंगले 22 मे रोजी कामावरून लोकलने घरी परतताना ठाणे स्थानकाजवळ चोरटय़ाने मोबाईल चोरण्यासाठी त्याच्या हातावर काठीने जोरात हल्ला केला. त्यात जगन तोल जाऊन खाली पडला. या दुर्घटनेत त्याला दोन्ही पाय गमावावे लागले. दादरच्या मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये तो गेल्या आठ वर्षांपासून लेखा विभागात काम करतो. तीन महिन्यांपूर्वी 17 फेब्रुवारी रोजी कोकणातील देवगड येथे जगन याचे रूपालीशी लग्न झाले.

रूपाली बारावी शिकलेली असून ती गावीच लहानाची मोठी झाली. लग्नानंतर या दोघांनी मुंबई गाठली. आताच कुठे संसाराची सुरुवात झाली असताना बुधवारी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकदरम्यान प्रवास करणाऱया जगन जंगलेच्या सुखी संसारात फटका गँगने मोठे विघ्न आणले. मात्र आता काहीही झाले तरी चालेल पण खचून जायचे नाही, असा निर्धार या जोडप्याने केला आहे. सध्या जगनवर हायलँड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून रूपालीने दाखवलेल्या जिद्दीला रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱयांनीदेखील सलाम केला आहे.

काळजी करू नका शिवसेना तुमच्या पाठीशी

मूळचे कोकणातील देवगड येथे असलेल्या जंगले यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी ठाण्यातील हायलँड हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. राऊत यांनी जंगले यांच्या प्रकृतीची विचारपूस करून डॉक्टरांशीही चर्चा केली. जगन याला आर्थिक मदत सुपूर्द करत राऊत यांनी घाबरू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास जंगले कुटुंबीयांना दिला.

दोन शस्त्रक्रियेनंतर कृत्रिम पाय

जगनवर येत्या 2 दिवसांत आणखी एक छोटी शस्त्रक्रिया होणार आहे. जखम साफ करून तो भाग बंद करण्यात येणार आहे. यासाठी जगनला अजून किमान 15 दिवस रुग्णालयातच राहावे लागेल. दरम्यान, 6 महिन्यांच्या कालावधीनंतर कृत्रिम पाय बसवण्यात येणार आहेत.
– डॉ. बाबासाहेब चव्हाण, (अस्थिरोग तज्ञ, हायलँड हॉस्पिटल)