
सामना प्रतिनिधी । जालना
जालना शहरातील चार घरफोड्या करणार्या आरोपींकडून १ क्रुझर जिपसह ७ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबर्यामार्फत माहिती मिळाल्यावरुन जालना शहरातील मस्तगड येथील उढाण कॉम्ल्पेक्स येथे रात्रीचे वेळी बंद असलेले अजय स्वरुपचंद गांग यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील ऐवज सराईत घरफोड्या करणारे किशोर बाळू खंदारे व त्याचा साथीदार गणेश शंकर शिंदे यांनी केली आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर व पोलीस कर्मचारी यांनी पथक तयार करुन पथकास सुचना देवून रवाना केले होते.
पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ राजेंद्रसिंह गौर यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे सराईत घरफोड्या करणारे किशोर बाळू खंदारे आणि गणेश शंकर शिंदे यांची माहिती काढून त्याचा शोध घेऊन त्यांना शिर्डी येथून ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही आरोपी जालना येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर जालना जिल्ह्यात दरोड्याचा प्रयत्न जबरी चोरी, घरफोडी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी सध्या शिर्डी येथे वास्तव्यास आहेत. सदर दोन्ही आरोपींना अटक करुन तपास पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडे घेण्यात आला. तपासात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडे शिताफीने तपास केला असता आरोपींनी ११ नोव्हेंबर रोजी उढाण कॉम्प्लेक्स येथील बंद असलेले घर फोडून घरातील नगदी रोख, दागिने व लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली आहे.
तपासात आरोपी गणेश शंकर शिंदे यांच्याकडून गुन्ह्यातील एकूण मालापैकी २५ हजार रुपये आणि गुन्ह्यात चोरलेले एक लेनिओ कंपनीचे जी ५- ५० मॉडेलचा लॅपटॉप ज्याची किंमत ४५ हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आले आहे. तसेच तपासात आरोपींकडून अधिक चौकशी केली असता ८ ऑक्टोंबर रोजी बालाजी नगर जालना येथील शेख अकबर शेख इसाक यांचे घरफोडून घरातील ऐवज चोरी केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरलेले ऐवजापैकी १० ग्रॅम सोन्याची मनी पोत, ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील फूल, ३ ग्रॅम सोन्याचा पत्ता असे एकुण ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याच आरोपींनी २५ ऑक्टोंबर रोजी देहेडकर वाडी जालना येथून सय्यद कदी सय्यद बागवान यांची उभी असलेली ५ लाख रुपये किंमतीची क्रुझर जिप चोरी केली होती. सदर चोरलेली जिप घेवून जाताना संगमनेर येथून पुढे जात असतांना तेथे पोलीसांची चेकींग चालू असल्याने रोडचे बाजुला जिप उभी करुन तेथून पळ काढल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, विश्वनाथ भिसे, हरीष राठोड, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशपांडे, संजय मगरे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, विनोद गडदे, सागर बाविस्कर, रंजित वैराळ आदींनी केली आहे.






























































