कर्जतमधील वन विभागाच्या तत्कालीन कर्मचाऱ्यांना अटक, ‘जलयुक्त शिवार’ घोटाळा प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत तालुक्यातील चांदे व कोंभळी येथे ‘जलयुक्त शिवार’च्या कामांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱयासह पाचजणांवर कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपचे तत्कालीन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याच मतदारसंघात हा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

तत्कालीन सहायक वनसंरक्षक रमेश गोविंद गोलेकर (निवृत्त), तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी शंकरराव पाटील (सध्या नेमणूक ः वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर), व्ही. वाय. शिंदे (मयत), शेखर रमेश पाटोळे (सध्या नेमणूक ः वनरक्षक, राजूर, ता. अकोले), पल्लवी सुरेश जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, पाटील, गांगर्डे व पाटोळे यांना अटक करण्यात आली आहे.

वन विभागाच्या वतीने 2015-16 साली ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील कोंभळी व चांदे या दोन गावांमध्ये समतल चर खोदण्याची कामे करण्यात आली होती. मात्र, या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आल्यामुळे या कामाच्या चौकशीचा आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आला होता. 4 सप्टेंबर 2021मध्ये लाचलुचपतने या सर्व कामांची चौकशी सुरू केली होती. चौकशीदरम्यान रमेश गोलेकर, शंकरराव पाटील, व्ही. वाय. शिंदे, शेखर पाटोळे यांनी मौजे कोंभळी येथे गट नंबर 181मध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानाअंतर्गत सलग समतल चर खोदण्याच्या कामात गैरव्यवहार करून नऊ हजार 320 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मृत शिंदे यांना वगळून इतरांवर कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा गुन्हा कर्जत तालुक्यातील चांदे येथे वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये घडला आहे. यामध्ये 12 मजुरांची नावे कॅशबुकमध्ये दाखवून त्यांना प्रत्येकी चार हजार 854 इतकी रक्कम मजुरी म्हणून देण्यात आल्याची खोटी नोंद करून 58 हजार 248 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी गोलेकर, पाटील, पल्लवी जगताप, बलभीम गांगर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांतील तिघांना अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, विजय ठाकुर, हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस नाईक विजय गंगुण, कॉन्स्टेबल वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हरून शेख व चालक राहुल डोळस यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.