जळकोट तालुक्यात कापूस पिकावर गोगलगायचा प्रादुर्भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जळकोट

अत्यल्प पावसामुळे जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. तालुका दुष्काळाने होरपळून निघाला. पीक वीमा मिळेल ही अपेक्षाही फोल ठरली. तालुक्यात यंदा उशिराने काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने मागील संकटाला बाजूला सारत उसनवारी आणि कर्जाच्या आधारावर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे . पण कापसावर गोगलगायचा प्रादुर्भाव आढळून आल्याने तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

जळकोट तालुक्यात मागील वर्षी निसर्ग व शेतीने साथ दिली नसल्याने शेतक-यांचे अपरिमित नुकसान झाले. पीक वीमा कंपनीने नुकसानीकडे दुर्लक्ष करुन पीक वीमा नामंजूर केला. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा संकटाच्या खाईत लोटला गेला. यंदा जून महिना संपेपर्यंत पाऊसच झाला नाही. उशिरा झालेल्या पावसानंतर मोठी हिम्मत करीत यंदा शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र पुन्हा एक नवे संकट घोंघावत आहे.

पेरणी नंतर उगवलेल्या कापसाच्या पिकावर गोगलगायचा प्रादुर्भाव वाढला आहे. येणारा प्रत्येक वर्ष काही ना काही संकट घेऊन शेतकऱ्यांसमोर येत आहे. त्यामुळे शेती कशी करावी? दरवर्षी संकटेच झेलायची का? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

कापसावर गोगलगायचा प्रादुर्भाव झाल्याचे कळताच जळकोटचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय सतर्क झाले आहे. चेरा (ता.जळकोट ) येथील शेतकरी संजय दिगंबरराव मरेवाड यांच्या शेतात जाऊन मंडळ कृषी अधिकारी जीवन लखने व कृषी सहायक मनीषा रेणापूरकर यांनी कापसावरील गोगलगायच्या प्रादुर्भावाची पाहणी केली व त्यावर उपाययोजनेबाबत माहिती दिली.

यंदाही संकटे आ वासून उभी असल्याने जळकोट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. वेळेवर पाऊस पडत नाही, पेरलेले उगवत नाही, उगवलेले पीक रोगांच्या विळख्यात सापडते अशा ना ना प्रश्नांनी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कृषी विभाग गोगलगायच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे, असे मंडळ कृषी अधिकारी जीवन लखने व कृषी सहायक मनीषा रेणापूरकर यांनी सांगितले.