जालन्यात तरुणाचा खून करून मृतदेह तलावात फेकला, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

जालन्यात तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह तलावात फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दोन संशयित आरोपींनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लालवाडी येथील युवक योगेश भुजंगराव सुळसुळे हा 5 डिसेंबरपासून बेपत्ता होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तरुण हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र या प्रकरणात घातपात झाल्याचा सुगावा पोलिसांना लागताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. योगेश सुळसुळे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काल 7 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लालवाडी शिवारात एका तलावात योगेश सुळसुळेचा मृतदेह सापडला.

घातपाताचा संशय असल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी ज्ञानेश्वर किसन शिंदे, रामप्रसाद ज्ञानेश्वर शिंदे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर या प्रकरणातील संशयित आरोपी शिवप्रताप ज्ञानेश्वर शिंदे हा अद्याप फरार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी ही कारवाई केली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण करीत आहेत. शेताच्या बांधावर काट्या लावण्यावरून मयत आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये वाद असल्याची प्राथमिक माहिती अंबड पोलिसांनी दिली.