
जालना जिल्ह्यातील मंठा येथील इनाम गल्लीतील गोदामावर गुरुवारी रात्री छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखा व अन्न औषध प्रशासनाने राज्यात बंदी असलेला 21 लाख 80 हजार रुपयांचा गुटखा पकडला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी शेख आवेज आरिफ (30) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध मेठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंठा येथील इनाम गल्ली येथील एका गोदामात राज्यात बंदी असलेला गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व अन्न औषध प्रशासनाला मिळाली. या माहितीवरून अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून गोदामाची झडती घेतली असता, त्यात राज्यात बंदी असलेला राज निवास पान मसाला, गोवा गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा दिसून आला.
घटनास्थळाचा पंचनामा करून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी शेख आवेज आरिफ याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी संशयित आरोपी शेख आवेज आरिफ याच्याविरुद्ध मेठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गुटख्याची विक्री केली जात आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाला लक्ष देण्याची गरज आहे.




























































