जामखेडमधील भूतवडा तलाव ‘ओव्हरफ्लो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेड शहराला वरदान ठरलेला भूतवडा लघुपाटबंधारे तलाव पूर्णक्षमतेने भरल्याने जामखेडकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. शनिवारी (दि. 4) रात्री जामखेडसह पाटोदा तालुक्यात (जि. बीड) मोठय़ा स्वरूपात पाऊस झाल्याने विंचरणा नदीवरील सर्व लहान-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरून भूतवडा तलावात पाण्याची मोठी आवक झाली. त्यामुळे कालपर्यंत निम्माही नसलेला भूतवडा तलाव जोडतलावासह रविवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरला.

119 दशलक्ष घनफूट साठवणक्षमता असलेल्या भूतवडा लघुपाटबंधारे तलावात कालपर्यंत केवळ 40 दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा होता, तर 48.25 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भूतवडा जोडतलावातील पाणीसाठा निरंक होता. मात्र, शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रमी अवघ्या सहा तासांत दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

भूतवडा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे विंचरणा नदीला पूर आला असून, शहरातून वाहणाऱया विंचरणा नदीचे पाणी जामखेड-नगर रस्त्यावरील जुन्या दगडी पुलावरून वाहत आहे. विंचारणा नदीवरील 83.64 दशलक्ष घनफूट क्षमतेचा रत्नापूर लघुपाटबंधारे तलाव रविवारी दिवसभरात पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता लघुपाटबंधारे विभागाचे राम ढेपे यांनी व्यक्त केली आहे.