ट्रिंग… ट्रिंग! आता नाटकात व्यत्यय नाही! नाट्यगृहात महापालिका जॅमर बसवणार!

मुंबई महानगरपालिका आपल्या नाटय़गृहांमध्ये लवकरच मोबाईल जॅमर बसवणार आहे. यामुळे नाटक सुरू असताना वारंवार वाजणाऱया मोबाईलमुळे कलाकार-प्रेक्षकांना नाहक होणारा मनस्ताप थांबणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तीस दिवसांत निर्माता, आयोजक, संस्था आणि नागरिकांकडून हरकती-सूचना मागवण्यात येणार आहेत.

नाटक सुरू असताना मोबाईल वाजल्यास प्रेक्षक आणि कलाकार यांचे लक्ष विचलित होत असल्यामुळे नाटक किंवा कार्यक्रम सुरू होण्याआधी पालिकेच्या अखत्यारीतील नाटय़गृहात प्रेक्षकांना शांतता राखण्याचे आणि मोबाईल सायलेंट मोडवर ठेवण्याचे आवाहन करण्यात येते. शिवाय या ठिकाणी असणाऱया स्वयंसेवकांकडूनदेखील मोबाईलबाबत प्रेक्षकांना वारंवार सूचना देण्यात येतात, मात्र प्रयोगादरम्यान अनेकांचा फोन वाजल्याने कार्यक्रमात अडथळे निर्माण होण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर नाटय़कलावंत विक्रम गोखले, सिद्धार्थ जाधव, सुमित राघवन, सुबोध भावे यांच्यासह अनेक नाटय़कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे नाटय़गृहांमध्ये भ्रमणध्वनी प्रतिरोध यंत्रणा म्हणजे जॅमर बसकण्याची मागणी विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी पालिकेच्या महासभेत ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. याला पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय देताना लवकरच कार्यवाही करू असा अभिप्राय दिला आहे.

आणीबाणी निर्माण झाल्यास आयोजक, निर्माता जबाबदार
पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला असला तरी नाटय़गृहात जॅमर बसकल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना तसेच प्रेक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे कोणताही संपर्क साधता येणार नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

त्यामुळे पालिकेकडून बसवण्यात येणाऱया जॅमरची सुविधा संबंधित नाटय़निर्माता, संस्था, आयोजक तसेच आरक्षणकर्ते यांच्याकडून लेखी स्वरूपात मागणी केल्यास प्रशासनाच्या मंजूर अटी क शर्तींनुसार उपलब्ध करून देण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे मोबाईल जॅमर यंत्रणा बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहील, असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोबाईल जॅमर बसवण्याबाबत कार्यवाही करायची असल्यास केंद्र शासनाच्या संबंधित विभागाच्या पूर्वमंजुरीनंतरच अंमलबजावणी करता येईल, असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या