उद्धव ठाकरे यांचा आज मिरजमध्ये ‘जनसंवाद’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘जनसंवाद यात्रे’चा झंझावात उद्या गुरुवारी (21 रोजी) मिरजमध्ये धडकणार आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर असलेल्या कोळेकर मठाच्या मैदानावर संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर विराट सभा होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या दुपारी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. तेथून ते सांगलीकडे प्रयाण करतील. सांगलीतील कृष्णाकाठी असणाऱया वसंतदादा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मिरज येथील सभास्थानी रवाना होतील. जनसंवाद यात्रेतील सांगली जिह्यातील मिरज येथील सभा विराट होईल, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेणार
उद्धव ठाकरे हे सांगली जिह्यातील मिरज येथे होणाऱया सभेनिमित्त उद्या सांगली, कोल्हापूर दौऱयावर येत आहेत. कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे सायंकाळी न्यू पॅलेस येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेणार आहेत.