
सामान ऑनलाईन । टोकियो
देशातील पुरुषांनी रुढीवाद झुगारून कुटुंबवत्सल बनावे, मुलांमध्ये मिळून मिसळून आनंदी सतत हसतमुख राहावे आणि नेहमी तरुण दिसावे यासाठी सरकारने योजना सुरू केली. या योजनेचे आता सकारात्मक परिणाम दिसत आहेत. जपानमध्ये सरकारने यासाठी इकुमेन प्रकल्प राबवला. त्यामुळे या देशातील पुरुष आता कुटुंबवत्सल होत आहेत. मुलांची देखभाल करणारा त्यांची काळजी घेणरा पिता म्हणजे इकुजी आणि इकेमेन म्हणजे तारुण्य जपणारा, सुंदर, हसतमुख माणूस. या दोन्ही शब्द एकत्र करून इकुमेन नावाचा प्रकल्प जपान सरकारने राबवला. कटुंबांमध्ये पुरुषाचा सहभाग वाढवण्यासाठी 2010 मध्ये हा प्रकल्प सुरू केला. आता जपानमध्ये हा प्रकल्प समाजाचा अविभाज्य भाग बनला आहे.
हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जपानमध्ये फक्त घरासाठी पैसे पुरवणे एवढाच पुरुषाचा सहभाग होता. कार्यालयात उशीरापर्यंत काम करून कटुंबाला जास्तीतजास्त पैसे पुरवण्याकडे पुरुषांचा कल होता. या पैशांमुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततता मिळते, अशी धारणा होती. 1980 च्या दशकात पुरुष दिवसातील फक्त 40 मिनिटेच मुलांना आणि कुटुंबाला देत होते. त्यामुळे ‘खत्रुड बाप’ अशीच जपानी पित्यांची ओळख होती. मुलांना त्यांच्या वडिलांबाबत विचारले असता, जिशिन (भूकंप आणणारे), कमीनारी (वादळी व्यक्तिमत्व) आणि काजी (आग लावणारे) अशा शब्दांत अनेकांनी आपल्या वडिलांचे वर्णन केले. वडिलांच्या अशा वर्तनामुळे अनेक मुलांनी नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्या केली होती. ही बाब गांभीर्याने घेत तेथील सरकारने पुरुषांचा कटुंबामधील सहभाग वाढवण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला. मुले झाल्यानंतर त्यांच्या संगोपनासाठीही जपानी पुरुष सुट्टी घेत नव्हते. 2002 मध्ये फक्त 0.33 टक्के पुरुषांनी पिता झाल्यावर सुट्टी घेतली होती. या काळात फक्त एक तृतीयांश पुरुषांनी कुटुंबासाठी वेळ दिला. रुढीवादी जपानमध्ये पिता झाल्यावर सुट्टी घेतल्यास वरिष्ठ आणि सहकारी काय म्हणतील अशी भीती पुरुषांना होती. त्यामुळे जपानमध्ये अशा सुट्टी कोणीही घेत नव्हते.
सरकारने तातडीने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली. त्यासाठी त्यांची पत्रकेही काढली. पुरुषांनी कुटुंबातील सहभाग कसा वाढवावा, याबाबत जनजागृती करण्यात आली. पुरुषांनी रुढीवादी भूमिका सोडण्यासाठी समुपदेशनही करण्यात आले. फक्त पैसा पुरवणे हेच पुरुषाचे कर्तव्य नसून मुलांना चांगले आणि सुरक्षित वातावरण देणे याकडे पुरुषांनी लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. पित्यांची खत्रुड बाप ही ओळख बदलण्यासाठी, वडिलांना आदर देण्यासाठी मॅगेझीन फादर्स क्वाटर्ली काढण्यात येते. त्यात कुटंबात मिसळणाऱ्या मुलांसह दंगामस्ती करणाऱ्या वडिलांचे आणि मुलांचे फोटो छापण्यात येतात. तसेच प्रसारमाध्यमांनी यावर मालिकाही बनवल्या. त्यात आई घरात नसताना वडील मुलांना कसे सांभाळतात हे दाखवण्यात आले. त्यामुळे अनेकांना प्रोत्साहन मिळाले.
ही योजना सुरू झाल्यानंतर आता परिस्थिती बदलत आहे. मुलांचा जन्म झाल्यावर सुटी घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2012 मध्ये 1.9 तर 2017 मध्ये 7 टक्के पुरुषांनी पितृत्व रजा घेतली होती. पुरुषांनी कार्यालय सांभाळून अर्थार्जन करावे आणि महिलांनी घरकाम करावे असे मानणाऱ्या पुरुषांची संख्या 60 टक्क्यापेक्षा जास्त होती. ती कमी होऊन आता 45 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. सरकारच्या या एका प्रकल्पामुळे जपानमधील पुरुष कुटुंबवत्सल होत आहेत.




























































