IPL 2024 – …तर बुमरा कॅनडासाठी टी-20 वर्ल्ड कप खेळला असता

हे खरं आहे की जसप्रीत बुमरा हिंदुस्थानी गोलंदाजीचा कणा आहे, पण त्याला हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले नसते तर तो क्रिकेट खेळण्यासाठी कॅनडात स्थायिक होण्याचा विचार करत होता, असा गौप्यस्फोट चक्क बुमरानेच एका कार्यक्रमात केला. याचाच अर्थ यंदाच्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये बुमराने कॅनडाकडून खेळताना दिसला असता.

मुंबई इंडियन्सकडून यंदाचा आयपीएल हंगाम गाजवत असलेल्या जसप्रीत बुमराने सांगितले की, हिंदुस्थानी क्रिकेट संघात वर्णी लागली नसती तर बी प्लॅननुसार कॅनडात स्थायिक होण्याचा मार्ग निवडला असता. बुमराची पत्नी संजना गणेशनने ‘जिओ सिनेमा’वरील एका कार्यक्रमात बोलताना जसप्रीत बुमराला विचारलं की, कॅनडाला जाऊन तेथे स्थायिक होत नवं आयुष्य सुरू करण्याचा तुझा इरादा होता का? त्यावर बोलताना बुमरा म्हणाला, ‘हो, अशा प्रकारची चर्चा मी माझ्या कुटुंबीयांशी केली होती. माझे काही नातेवाईक कॅनडात राहतात. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी माझ्या कॅनडातल्या काकांकडे जाणार होतो, मात्र माझी आई हिंदुस्थान सोडण्यास तयार नव्हती. त्यानंतर जसप्रीत बुमराचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न सत्यात उतरलं. मी नशीबवान आहे की, माझा प्लॅन ए यशस्वी झाला अन् मी क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करू शकलो. नाहीतर कदाचित आज मी कॅनडासाठी क्रिकेट खेळताना दिसलो असतो.

संजूला दुहेरी दंड

आपल्या फलंदाजीने राजस्थान रॉयल्सला सावरणार्या संजू सॅमसनला गुजरात टायटन्सविरुद्ध दुहेरी दंडाला सामोरे जावे लागले. एक तर त्यांचा संघ जिंकता जिंकता हरला आणि सामन्यादरम्यान शेवटची षटके अत्यंत धिम्या गतीने टाकल्यामुळे त्याला कर्णधार या नात्याने 12 लाख रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे. हे आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन असल्यामुळे ही राजस्थानची पहिलीच वेळ असल्यामुळे त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

राशीदच्या प्रेमात गावसकर

राशीद खान असा खेळाडू आहे जो कमी तिथे आम्ही म्हणत नेहमीच उपयोगी पडतो. त्याच्या याच खेळामुळे तो प्रेंचायचीझचा आवडता खेळाडू तर आहेच पण खुद्द सुनील गावसकरही त्याच्या प्रेमात पडले आहेत. राशीद नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत यशस्वी ठरला आहे. जेव्हा त्याच्याकडून धावांची गरज असते तेव्हा त्याने हमखास धावा केल्य आहेत. तो क्षेत्ररक्षणातही अव्वल आहे. तो धावा वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने झेपावतो, त्यामुळे  त्याच्या खांदा निखळून कारकीर्दही धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही गावसकर यांनी व्यक्त केली.