Javed Akhtar – जे औरंगजेबाला जमले नाही ते मोदी सरकार काय संपवेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

धर्मनिरपेक्षता ही हिंदुस्थानची विचारधारा आहे. 50 वर्षे औरंगजेबाने राज्य केले, पण त्यालाही हिंदुस्थानची विचारधारा संपवता आली नाही, मग पाच वर्षे झालेल्या मोदी सरकारला काय ती संपवता येणार! धर्मनिरपेक्षता हीच खरी आपली ओळख आहे. याच मुद्दय़ावर लक्ष ठेवून आता जनताच सत्तांतर करेल, असे परखड भाष्य ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

सोफिया महाविद्यालयातील सभागृहात महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त ‘अहिंसा आणि सौहार्द’ या विषयावर बुधवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जावेद अख्तर यांनी विचार मांडले. न्यायव्यवस्थेवर सगळीकडून दबाव आणला जातोय. विलंबित न्यायाच्या दुरुस्तीसाठी काय उपाययोजना केल्या? यासाठी जनतेचा दबाव धोरणकर्त्यांवर असला पाहिजे अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी मांडली. या कार्यक्रमात साहित्यिका कवी प्रज्ञा दया पवार, मीरा बोरवणकर, दिल्लीच्या विद्यार्थी परिषदेची प्रतिनिधी कौऊलप्रीत कौर आदींचा सहभाग होता.

प्रत्येक घटकाने आवाज उठवावा

हिंदुत्वाच्या नावाखाली धर्मामध्ये द्वेष, हिंसा पसरवली जात आहे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे हनन होत आहे. विज्ञान, कलांमध्ये खुळचट गोष्टींचा शिरकाव होत आहे. हे एक प्रकारे राज्यघटनेवरील हल्ले आहेत. ते थांबवले पाहिजेत. त्याकरिता गांधीनी जे केले ते आपण केले पाहिजे, एकजूट दाखवली पाहिजे, न पटणाऱ्या गोष्टींविरोधात बोलले, लिहिले पाहिजे अशी भूमिका ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांनी मांडली. आम्ही साहित्यिकांनी पुरस्कार वापसी करून विरोध केला. ही चळवळ अधिक विस्तारायला हवी, असे मत सहगल यांनी व्यक्त केले.

तेच लोक वल्लभभाई, भगत सिंगांना पळवत आहेत

आज गांधी प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत तसेच गांधींना मारणाऱ्यांची विचारधाराही जिवंत आहे. स्वातंत्र्यलढय़ात योगदान नसणाऱ्यांनी गांधींना मारले. आज तेच लोक वल्लभभाई पटेल, भगत सिंग यांना पळवत आहेत, अशी टीका अख्तर यांनी केली. सर्वांना समान न्याय द्या आणि केवळ अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण नको, असे विचार अख्तर यांनी मांडले.